
लोणी देवकर येथे व्यवस्थापकास मारहाण
मारहाण करत,जीवे मारण्याची धमकी..
इंदापूर;प्रतिनिधि
इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील औद्योगिक वसाहतीमधील कंपनीमध्ये व्यवस्थापकासह इतरांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विजय चोरमले, प्रदीप करे, संदीप चितळकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत माधव वसंत जाधव(वय 42, व्यवसाय – नोकरी, रा.बाब्रसमळा, ता. इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोणी
देवकर एम आयडीसीमधील इएसबीइइ पॉवर सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत मागील सहा वर्षांपासून फिर्यादी हे कंपनी व्यवस्थापक म्हणून नोकरी करीत आहे. कंपनी कार्यालयात काम करताना सोमवारी (दि.14) जुलै रोजी विजय चोरमले (रा. बळपुडी, ता.इंदापूर) याने त्याचे साथीदार प्रदिप करे, संदीप चितळकर यांनी कार्यालयामध्ये येऊन फिर्यादीला ‘तु आम्हाला हलक्यात घेतोय,आम्ही तुम्हाला काम मागतोय तर तुला समजत नाही, आता तु आम्हाला कमिशन म्हणून तीस लाख रुपये दे,’ अशी मागणी केली.
यावर फिर्यादी यांनी ‘माझ्या हातात काही नाही, तुम्ही कंपनीचे मालकांशी बोला,’ असे सांगितले. यावर आरोपींनी चिडून जात फिर्यादीस मारहाण केली. कंपनीचे एचआर यशवंत यादव, चालक सचिन शेलार हे भांडण सोडविण्यासाठी आले असता तिघांनी त्यांनाही मारहाण केली व फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी तिघा जणांविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार काळे करत आहेत.