वाईच्या हरिहरेश्वर सहकारी बँकेत ११२ बनावट कर्जप्रकरणे तयार करुन बँकेच्या ३७ कोटी ४६ लाखांचा अपहार; संचालक मंडळाविरोधात गुन्हा दाखल
याबाबतची तक्रार सहकारी संस्थांचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक विजय दत्तात्रय सावंत यांनी वाई पोलीस ठाण्यात केली आहे.
वाईच्या हरिहरेश्वर सहकारी बँकेत ११२ बनावट कर्जप्रकरणे तयार करुन बँकेच्या ३७ कोटी ४६ लाखांचा अपहार; संचालक मंडळाविरोधात गुन्हा दाखल
याबाबतची तक्रार सहकारी संस्थांचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक विजय दत्तात्रय सावंत यांनी वाई पोलीस ठाण्यात केली आहे.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
बनावट दस्तऐवजाच्या आधारे ११२ कर्जदारांच्या नावावर कर्ज घेऊन ३७ कोटी ४६ लाख ८९ हजार रुपयांचा अपहार आणि फसवणूक केल्याचा प्रकार वाईच्या हरिहरेश्वर सहकारी बँकेत उघड झाला आहे. या प्रकरणी वाई पोलिसांनी हरिहरेश्वर सहकारी बँकेचे संस्थापक संचालक नंदकुमार खामकर, उपाध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक, रोखपाल आणि तीन सनदी लेखापाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
११२ कर्जदारांच्या नावे बोगस कर्ज
वाईतील हरिहरेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष अजित गुलाबराव खामकर, उपाध्यक्ष जगन्नाथ बाजीराव सावंत, संस्थापक संचालक नंदकुमार ज्ञानेश्वर खामकर, संस्थापक संचालक वजीर कासमभाई शेख, संचालक मनोज श्रीधर खटावकर, प्रकाश केरबा ओतारी, विलास गणपत खामकर, चंद्रकांत धर्माजी शिंदे, विष्णुपंत शंकर खरे, अर्जुन दिगंबर खामकर, जनार्दन आनंदा वैराट, किरण भास्कर कदम, जयश्री वसंत चौधरी, जयमाला विजय खामकर, गोविंद तुकाराम लंगडे तज्ञ संचालक अरुण महादेव केळकर, अॅड. संतोष शिवाजी चोरगे, व्यवस्थापक रमेश दगडू जाधव, शाखा प्रमुख विनोद मनोहर शिंदे(वाई) रणजीत खाशाबा शिर्के (खंडाळा), सुनिल चंद्रकांत पंजारी (वडूथ), वसंत आनंदा सणस (भुईज), रोखपाल सुचित महादेव जाधव (वाई), महेश प्रताप शिंदे (वडूथ), दिपक धर्माजी शिर्के (भुईंज), तानाजी मानसिंग भोसले (खंडाळा), सनदी लेखापाल राहुल धोंगडे, डी. बी. खरात, एन. एस. कदम यांनी हरिहरेश्वर डेव्हलपर्स वाई या फर्मच्या नावे सोनगिरवाडी वाई येथील मिळकतीवर ६२ कर्जदारांच्या नावे कर्ज काढले.
तसेच वजीर कासमनाई शेख यांनी एशियन डेव्हलपर्स या फर्मच्या माध्यमातून ५० कर्जदारांच्या नावे बनावट कागदपत्रे व दस्तऐवज तयार करुन गहाणखत व कर्ज प्रकरणे दाखवले. या कर्जदारांना बँकेकडून बांधकाम केलेल्या सदनिका दिल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले. त्या माध्यमातून बॅंकेतून संबंधितांच्या नावे कर्ज घेवून बँकेच्या सभासदांची व ठेवीदारांची उपरोक्त सर्वांनी फसवणूक केली आहे.
गैरविनियोग व अपहार-
पदाचा दुरुपयोग गैरवापर करुन स्वतःच्या आर्थिक स्वार्थाकरीता बॅंकेचे सभासद असलेल्या ठेवीदारांचा या आरोपींनी विश्वासघात केला आहे. एकूण ११२ बनावट कर्जप्रकरणे तयार करुन बँकेच्या २६ कोटी ७८ लाख ८ हजार ७८९ निधीचा या संचालक मंडळाने गैरविनियोग केला आहे. बँकेच्या २०१५-१६ ते २०१८-१९ या कालावधीत प्रत्यक्षात बनावट कर्ज खात्यावर रकमेचा भरणा न करता बनावट ११२ कर्जखात्यावर रक्कम भरणा केल्याचे दर्शवून एकूण १० कोटी २४ लाख ४२ हजार १५४ एवढया रकमेचा अपहार केला. याबाबतची तक्रार सहकारी संस्थांचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक विजय दत्तात्रय सावंत यांनी वाई पोलीस ठाण्यात केली आहे.
सहा मयत तर उर्वरीत फरार
काही पतसंस्थांनी बँकेत ठेवलेल्या व परत काढून घेतलेल्या गुंतवणूकीवर बनावट ठेवतारण कर्जप्रकरण तयार करुन ४४ लाख ३८ हजार ४०१ रुपयांचा अपहार केला. अशा पद्धतीने सर्वांनी संगनमताने ३७ कोटी ४६ लाख ८९ हजार ३४४ फसवणूक केली आहे. मागील १८ महिन्यांपासून या बँकेचे व्यवहार ठप्प झाले असून ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळणे बंद झाले आहे. काही ठेवीदारांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रारी केल्या होत्या. यानंतर बँकेचे विशेष लेखापरीक्षण विशेष लेखा परीक्षक विजय सावंत यांनी मागील वर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान करून अहवाल सादर केला होता. त्याप्रमाणे जिल्हा उपनिबंधक अष्टेकर यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्या पैकी अध्यक्ष अजित खामकर, संचालक वजीर शेख, विलास खामकर, जनार्दन वैराट, गोविंद लंगडे, अरुण केळकर हे सहा मयत असून अन्य सर्व संशयित फरारी आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे करत आहेत.