
वालचंदनगर पोलिसांकडून ६५ हजार ७२४ रुपये किंमतीचा गांजा जप्त
गांजा बाळगणाऱ्यांवर गुन्हे दाखल
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील मौजे शेळगाव गावच्या हद्दीत घरात गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी ठेवला आहे अशा गोपनीय माहितीच्या आधारावर वालचंदनगर पोलीसांनी छापा टाकत ६५,७२४ रुपये किंमतीचा ५ किलो ४७४ ग्रँम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे.
सागर साहेबराव मोहिते रा. शेळगाव व ज्ञानदेव सुदाम मदने रा. शेळगाव अशी आरोपींची नांवे असून सदर आरोपीविरुध्द पो.हवा. माने यांनी एन.डी.पी.एस. अँक्ट १९८५ चे कलम २० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैद्य व्यवसाय तसेच मालमत्तेविषयक चोरी चे गुन्हे घडु नये म्हणुन पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण मिलिंद मोहिते यांनी सुचना देवुन मार्गदर्शन केले होते. त्यानुसार वालचंदनगर पोलिसांनी गोपनीय बातमीदाराच्या खबरीवरुन उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी दुपारी ३ च्या दरम्यान कारवाई केली.
वालचंदनगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गोपणीय बातमी मिळाली होती की, सागर साहेबराव मोहिते यांने आपल्या घरामध्ये गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगला आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिलीप पवार,पोलीस उपनिरीक्षक अतुल खंदारे,पो.हवा. प्रकाश माने,पो.ना.उत्तम खाडे, पो.ना.अमर थोरात,पो.काँ. अजित थोरात,पो.काँ. अमोल चितकोटे, महीला पो.कॉ. मोनिका मोहिते,चालक पो.कॉ.किसन बेलदार,होमगार्ड खुडे, हगारे, कुंभार, पताळे या पथकाने मोहिते यांच्या शेळगाव येथील घरी छापा घातला असता एक पांढरे रंगाची पिशवी मध्ये खाकी रंगाचे दोन पुढे आढळून आले. त्यापैकी एका पुढ्यात २ किलो १०६ ग्रँम वजनाचा गांजा व दुस-या पुढ्यात २ किलो १०६ ग्राम वजनाचा अंदाजे ५०,५४४ रुपये किंमतीचा गांजा मिळुन आला.
सदरील कारवाई करतेवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना याच गावात आणखी एका व्यक्तीच्या घरात गांजा विक्रीस ठेवला आहे अशी माहिती मिळाली.त्या माहितीनुसार ज्ञानदेव सुदाम मदने यांच्या घरात छापा घातला असता लाकडी कपाटामध्ये १ किलो २६५ ग्रँम वजनाचा १५,१८० रुपये किंमतीचा गांजा मिळून आला.दोन्ही ठिकाणचा मुद्देमाल दोन पंचासमक्ष, फोटोग्राफर यांचे समक्ष वरील पथकाने जप्त केला आहे.