विकासाच्या भरोशावर प्रचार :डॉ चित्रलेखा ढोले
गावागावात प्रचार अत्यंत सकारात्मक वातावरणात सुरू..

विकासाच्या भरोशावर प्रचार :डॉ चित्रलेखा ढोले
गावागावात प्रचार अत्यंत सकारात्मक वातावरणात सुरू..
आदित्य बोराटे –
इंदापूर तालुका विकासाच्या मार्गावर ठामपणे उभा असून, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचारांना पुढे नेत कर्तव्याला प्राधान्य देत राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण यंत्रणा पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे. महाराष्ट्राचे हृदय हेलावणाऱ्या या दुःखद घटनेच्या वेदना मनात साठवून, “सर्वप्रथम काम आणि नंतर भावना” हा अजितदादांचा मंत्र जपत आम्ही प्रचार आणि सेवा करत आहोत, असे भावनिक पण ठाम शब्द लाखेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच डॉ. चित्रलेखा श्रीमंत ढोले यांनी व्यक्त केले.

काटी –लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद सदस्य उमेदवार श्रीमंत ढोले व पंचायत समिती उमेदवार विमलताई काळे आणि बापूसाहेब शेंडे यांच्या प्रचारासाठी शेटफळ हवेली (ता. इंदापूर) गावात आल्यावर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. गावागावात प्रचार अत्यंत सकारात्मक वातावरणात सुरू असून, विकासकामांची दिशा आणि त्याचे परिणाम जनतेला स्पष्टपणे जाणवत आहेत.

या परिसरात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून रस्ते, सभामंडपासह विविध विकासकामे पूर्ण झाली असून अनेक कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. तसेच माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह सर्व नेते एकत्र आल्याने कोणतेही मतभेद नसून, तालुका, गट, गण आणि गावाचा सर्वांगीण विकास हेच एकमेव ध्येय असल्याचे डॉ. ढोले यांनी अधोरेखित केले.

यावेळी त्यांनी संपूर्ण तालुक्यातील मतदारांना आवाहन करताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना साथ द्या. संधी दिली तरच संधीचे सोने करता येते आणि ग्रामस्थांचा खऱ्या अर्थाने विकास साधता येतो. सर्वसामान्यांपर्यंत सुविधा, सेवा आणि विकास पोहोचवण्यासाठी ही साथ महत्त्वाची आहे, असेही त्यांनी नमूद केले.





