दुर्दैव घटना; बारामती तालुक्यातील कारखेल येथे शेळ्या चारताना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
तीन महिन्यांपूर्वी अज्ञात ट्रकच्या धडकेत तुटल्या होत्या.

दुर्दैव घटना; बारामती तालुक्यातील कारखेल येथे शेळ्या चारताना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
तीन महिन्यांपूर्वी अज्ञात ट्रकच्या धडकेत तुटल्या होत्या.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील कारखेल येथे शेळ्या चारताना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 13) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. अल्केश जगनाथ लोंढे (वय 40) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारखेल हद्दीतील लोंढेवस्ती शेजारील गट क्रमांक २०४ मधील शेतात लोंढे शेळ्या चारत होते. रिमझिम पावसात वीजेच्या खांबाजवळील वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने त्यांना जोरदार धक्का बसला आणि ते जागीच कोसळले.
ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन लाकडाच्या दांड्याने त्यांना तारांपासून दूर केले. तत्काळ बारामती येथील रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
ग्रामस्थांनी सांगितले की, येथील रस्त्यावरुन लोंढेवस्ती नजिक शेती पंपांना वीजपुरवठा करणाऱ्या तारा तीन महिन्यांपूर्वी अज्ञात ट्रकच्या धडकेत तुटल्या होत्या. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्या तारांचा वीजपुरवठा बंद करून ठेवला होता. मात्र या परिसरात शनिवारी सकाळी लोंढे यांनी बाभूळची झाडे तोडल्याने झाडे विद्युत पुरवठा सुरु असलेल्या खांबावर पडली.
त्यामुळे वीजेच्या तारांना झोळ पडून तारा जमिनीजवळ आल्या व बंद असलेल्या तारांना अचानक वीज प्रवाह उतरल्याने हा अपघात घडला.
याबाबत जळगाव कडेपठार येथील महावितरण शाखा कार्यालयाचे शाखा अभियंता कांताराम भंडलकर यांनी घटनास्थळी पाहणी करून सांगितले, “वीज प्रवाह सुरु असताना झाडे तोडल्यामुळे एक झाड तारांवर पडले. त्यामुळे बंद असलेल्या तारांना विद्युत पुरवठा उतरला असावा आणि त्यातून हा अपघात घडला असावा.
या घटनेनंतर कारखेल परिसरात शोककळा पसरली असून लोंढे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा व एक मुलगी परिवार आहे.