विमा कंपनीकडून तातडीने नुकसान भरपाई मिळावी- डॉ. बाळासाहेब राऊत
68 दिवस उलटून देखील विमा कंपनीने नुकसान भरपाई दिली नाही
विमा कंपनीकडून तातडीने नुकसान भरपाई मिळावी- डॉ. बाळासाहेब राऊत
68 दिवस उलटून देखील विमा कंपनीने नुकसान भरपाई दिली नाही
इंदापूर: प्रतिनिधी
इंदापूर शहरातील राऊत हॉस्पिटल मध्ये कोविड -19 सेंटर दि. १२ ऑक्टोंबर रोजी सुरू करण्यात आले होते.त्यानंतर दोनच दिवसात दि.१४ ऑक्टोबर रोजी इंदापूर शहरात अतिवृष्टी झाल्याने राऊत हॉस्पिटल मधील तळ मजल्यात असलेले राम-सिता डायग्नोस्टिक सेंटर मध्ये चार फूट पाणी शिरले. सिटी स्कॅन मशीन,सोनोग्राफी मशीन,डिजिटल एक्सरे मशीन,या तिन्ही मशीन पाण्याखाली गेल्याने अंदाजे पाऊने तीन कोटी रुपये किंमतीच्या आसपास नुकसान झाले असल्याची माहिती डॉ.बाळासाहेब राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ.राऊत पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही मशीन बारामती सहकारी बँकेकडून कर्ज घेऊन खरेदी केल्या होत्या.या मशीनचा विमा आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीकडे केला होता.विम्याचे हप्ते नियमित भरलेले आहेत.
पाण्यामुळे सिटीस्कॅन, एम आर आय आणि डिजिटल एक्स-रे या मशीन बिघडल्यामुळे विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा प्रस्ताव दाखल केला. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी राम सीता डायग्नोस्टिक सेंटर ची पाहणी केली. याला 68 दिवस उलटून ही अद्याप कंपनीने नुकसान भरपाई दिलेली नाही.त्यामुळे नवीन मशिनरी आणून कार्यान्वित करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. कोविड सेंटर असताना रुग्णांचे सिटीस्कॅन करता येत नाही, रुग्णांना तातडीने औषध उपचार देता येत नाही.त्यामुळे विमा कंपनीने नुकसानभरपाई तातडीने द्यावी अशी मागणी डॉ.बाळासाहेब राऊत यांनी केली आहे.
दरम्यान विमा कंपनी कडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी विलंब होत असून रुग्णांच्या सेवेसाठी तातडीने नुकसान भरपाई मिळणे गरजेचे असून शेतकरी कुटुंबातील असलेल्या डॉक्टरला न्याय मिळणे आवश्यक असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.