विलीनीकरणावर ठाम राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांचं निलंबन सुरूच
आज दिवसभरात 1 हजार 88 कर्मचाऱ्यांच निलंबन केल्याचं समोर आलंय.
विलीनीकरणावर ठाम राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांचं निलंबन सुरूच
आज दिवसभरात 1 हजार 88 कर्मचाऱ्यांच निलंबन केल्याचं समोर आलंय.
प्रतिनिधी
एसटीचा संप जवळपास 15 दिवस चालल्यानंतर शेवटी हा संप चिघळला. काही कर्मचारी पगारवाढीवर समाधान मानत कामावर हजर राहिले, मात्र काही कर्मचारी अजूनही विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. ऐतिहासिक 41 टक्के पगारवाढ करून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं होतं, मात्र कर्मचाऱ्यांना सरकारचा हा निर्णय मान्य नाही. या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांच निलंबन सुरुच
विलीनीकरणावर ठाम राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून निलंबनाची कारवाई सुरू आहे. आज दिवसभरात 1 हजार 88 कर्मचाऱ्यांच निलंबन केल्याचं समोर आलंय. ही सर्वात मोठी निलंबनाची कारवाई आहे. फक्त निलंबनच नाही तर एसटी कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाईही करण्यात येत आहे. दिवसभरात 254 जणांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आलीय. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा आकडा खूप वाढला आहे. आतापर्यंत तब्बल 7 हजार 585 कर्मचाऱ्यांच निलंबन केल्याचं समोर आलं आहे. सेवा समाप्ततीची कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. आतापर्यंत एकूण 1 हजार 779 कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई केल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ उपोषण
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी कामगार नेते शरद राव यांनी परत डेपोच्या बाहेर उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता, पण दादर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पाच तासानंतर सोडले आहे. पण हे उपोषण ग्रामीण भागातल्या डेपो वर जाऊन सुरू ठेवणार आहे. असं राव यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष या संपावर मधला मार्ग काढावा आणि एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी उपोषणाचा मार्ग अवलंबला असल्याचं शशांक राव यांनी सांगितले आहे.