विवाहित महिलेशी जुळवलेले संबंध पोलीस अधिकाऱ्याच्या अंगलट ; पोलीस अधिक्षकांनी दिले चौकशीचे आदेश
महिलेने कौटुंबिक वादातून विष प्राशन केले होते.

विवाहित महिलेशी जुळवलेले संबंध पोलीस अधिकाऱ्याच्या अंगलट ; पोलीस अधिक्षकांनी दिले चौकशीचे आदेश
महिलेने कौटुंबिक वादातून विष प्राशन केले होते.
बारामती वार्तापत्र
बारामतीत नुकतेच एका पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या रासलिलांची मोठी चर्चा झाली होती. त्या वादग्रस्त अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. आता हा नवाच प्रकार पुढे आला आहे.
बारामती तालुक्यातील एका महिलेने कौटुंबिक वादातून विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेचा तपास बारामतीत कार्यरत असलेल्या या पोलिस उपनिरीक्षकाकडे देण्यात आला होता.
त्याने तक्रारदार महिलेच्या नंबरवर लगट साधत तिच्याशी जवळीक साधली. सातत्याने या महिलेच्या संपर्कात राहून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ती स्पर्धा परिक्षेची तयारी करत असल्याचे समजल्यानंतर तिला पुण्यात राहण्यास प्रवृत्त करत लागेल ती मदत
करण्याचं आश्वासन दिले. त्यामुळे ही महिला आपल्या दोन मुलींना सोडून पुण्यात वास्तव्यास गेली. त्यानंतर तिने हळूहळू आपल्या कुटुंबियांशी संपर्क कमी केला.
याच दरम्यान, संबंधित महिलेच्या हातावर या पोलिस अधिकाऱ्याच्या नावाचा टॅटू पतीला आढळला. त्यावरून दोघा पती-पत्नीत वादही
झाला. ही बाब समजल्यानंतर या मुजोर पोलिस अधिकाऱ्याने या महिलेच्या पतीलाच धमकावले. तिला काही बोलला तर हात पाय तोडीन, तिला त्रास झाला तर गाठ माझ्याशी आहे अशीही धमकी दिली.
ती एमपीएससीचा अभ्यास करत असल्याचे कळताच तिला पुण्यात ठेवण्याचे आमिष दाखविले. तिच्या पतीने, आपली पत्नी शिकून अधिकारी होईल या आशेपायी पतीने दोन मुली असताना तिला अभ्यासासाठी परवानगी दिली. परंतु ती पुण्यात गेल्यानंतर तिने कुटुंबाशी संबंध कमी करण्यास सुरुवात केली.
अधिकाऱ्याच्या नावाचा टॅटू तिच्या हातावर
१६ जानेवारी रोजी या अधिकाऱ्याच्या नावाचा टॅटू तिच्या हातावर पतीला दिसला. यावरून त्या दोघात वाद झाले. अधिकाऱ्याने लागलीच तिच्या पतीला फोन करत जाब विचारला. तुझे हात-पाय मोडीन अशी धमकी दिली. मी तिला माझ्या कंपनीतील १० टक्के वाटा देत आहे, तिला जर तू त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे, अशी धमकी त्याने दिल्याचे रेकॉर्डिंग तिच्या पतीने व्हायरल केले आहे.
हे प्रकरण गंभीर होत चालल्याचे लक्षात आल्यावर संबंधित तक्रारदार याने ही गोष्ट भावंडांना सांगितली. संबंधित कुटुंबाने लागलीच पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे. पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तातडीने अप्पर पोलीस अधिक्षक यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत,
चौकशी सुरु आहे. चौकशी पूर्ण झाल्यावरच यासंबंधी अधिक बोलता येईल.– मिलिंद मोहिते, अपर पोलिस अधिक्षक, बारामती.
दरम्यान, या पोलिस उपनिरीक्षकाचे अनेक कारनामे असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे. आपल्या वर्दीचा गैरफायदा घेवून अनेकांना या अधिकाऱ्याने त्रास दिल्याचे बोलले जात आहे.