शरद पवारांच्या घरी लगीनघाई! युगेंद्र पवारांचेही ठरले, पवारांची नातसुन ‘तनिष्का’ आहे तरी कोण? सुप्रिया सुळेंनी शेअर केले फोटो
काही महिन्यांपूर्वीच अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा संपन्न

शरद पवारांच्या घरी लगीनघाई! युगेंद्र पवारांचेही ठरले, पवारांची नातसुन ‘तनिष्का’ आहे तरी कोण? सुप्रिया सुळेंनी शेअर केले फोटो
काही महिन्यांपूर्वीच अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा संपन्न
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली असून, युगेंद्र आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नी तनिष्का प्रभू यांचा एक फोटोही त्यांनी शेअर केला आहे
काही दिवसांपूर्वी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या त्यांच्या साखरपुड्यानंतर त्यांची होणार बायको नेमकी कोण? याबाबत गुढ कायम होते, मात्र आता त्यांची होणारी पत्नी म्हणजेच पवार कुटुंबाची होणारी सून नेमकी कोण आहे, हे उघड झाले आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी सस्पेन्स हटवला असून सुनेचे फोटोही पोस्ट केले आहेत.
सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर युगेंद्र आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नीचा सुंदर फोटो पोस्ट करत या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या स्टेटसमुळेच युगेंद्र पवार यांच्या पत्नीचे नाव तनिष्का असल्याचे समोर आले आहे.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या स्टेटसमध्ये म्हटले आहे की, “युगेंद्रचा तनिष्कासोबत साखरपुडा पार पडला. आम्ही खूप आनंदी आहोत. रुतू, वेदिका आणि आता तनिष्काचं कुटुंबात स्वागत आहे.” या संदेशातून त्यांनी नववधु तनिष्काचे पवार कुटुंबात स्वागत केले आहे. हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
गेल्या काही काळापासून युगेंद्र पवार राजकारणात सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिल्यानंतर शरद पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना अजित पवार यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती, ज्यात त्यांनी काकांना चांगली लढत दिली होती. राजकीय वाटचालीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या युगेंद्र पवार यांच्या जीवनातील या नव्या टप्प्याबद्दल सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
युगेंद्र पवार कोण आहेत?
युगेंद्र पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू असलेल्या श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म 22 एप्रिल 1991 रोजी झाला आहे. अमेरिकेतील नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठातून फायनान्स-इन्शुरन्स विषयात पदवीचे शिक्षण घेतले आहे. ते शरयू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत. शिवाय युगेंद्र पवार यांच्यावर विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदारपदाची जबाबदारी आहे. शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती, इंदापूर आणि फलटण तालुक्यात त्यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत. वनीकरण, ओढा खोलीकरण, विहीर बांधून देणं यामुळं अनेक शेतकऱ्यांशी ते जोडले गेले आहे. युगेंद्र पवार हे बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. विधानसभा निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवले होते. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांचा पराभव केला आहे.