शहीद जवान लक्ष्मण डोईफोडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शहीद जवानाला शेवटचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित

शहीद जवान लक्ष्मण डोईफोडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शहीद जवानाला शेवटचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी गावचे सुपुत्र शहीद जवान सुभेदार लक्ष्मण सतू डोईफोडे यांच्या पार्थिवावर आज (दि.२६) रोजी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहीद जवानाला शेवटचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुभेदार लक्ष्मण सत्तू डोईफोडे हे सिग्नल रेजिमेंट आसाम याठिकाणी ड्युटीवर होते. दि.२३ रोजी गस्त घालत असताना भारतीय जवानांची गाडी दरीत कोसळल्याने त्यांना वीरमरण आले होते. गावचा सुपुत्र देशाच्या रक्षणार्थ ड्युटीवर असताना शहीद झाल्याची बातमी समजताच बोराटवाडी गावासह संपूर्ण इंदापूर तालुक्यावर शोककळा पसरली होती.
शहीद जवान लक्ष्मण डोईफोडे यांचे पार्थिव आज सकाळी ९ च्या सुमारास बोराटवाडी येथे दाखल झाले.यावेळी सर्वप्रथम नायब तहसीलदार अनिल ठोंबरे व त्यानंतर सरपंच दत्तू सवाशे यांनी आदरांजली अर्पण केली व सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा बोराटवाडी गावातून ‘अमर रहे अमर रहे लक्ष्मण डोईफोडे अमर रहे ‘,भारत माता की जय,वंदे मातरम अशा घोषणा देत त्यांच्या राहत्या घराकडे निघाली. बोराटवाडी गावच्या रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. चौकाचौकात फलक लावण्यात आले होते. ठिकठिकाणी ग्रामस्थ पुष्पहार आणि फुले वाहून आदरांजली वाहत होते. काही काळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी घरी ठेवण्यात आले. येथे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी दर्शन घेतले. यावेळी कुटुंबियांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले होते.यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला.
अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पोलीस आणि लष्कराच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या 3 फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर शहीद जवान सुभेदार लक्ष्मण डोईफोडे यांचा मुलगा चेतन यांनी अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, आप्पासाहेब जगदाळे,श्रीमंत ढोले, अभिजीत तांबिले,अधिकारी, पदाधिकारी त्याचबरोबर लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी,सैनिक आणि हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
शहीद जवान लक्ष्मण डोईफोडे यांच्या पश्चात पाठीमागे आई छबुताई, वडील सतू, पत्नी सुवर्णा, मुलगा चेतन (२० वर्षे) आणि मुलगी वैष्णवी (१२ वर्षे) असा परिवार आहे.