मोठी बातमी! पुण्यात तयार होत असलेली कोविशील्ड लस भारतातच सर्वाधिक महाग, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये स्वस्त
अदर पुनवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार कोवीशिल्डच्या विक्रीतून सिरम इन्स्टिट्यूटला प्रतिलस केवळ 150 रुपयांचा नफा मिळत आहे.

मोठी बातमी! पुण्यात तयार होत असलेली कोविशील्ड लस भारतातच सर्वाधिक महाग, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये स्वस्त
अदर पुनवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार कोवीशिल्डच्या विक्रीतून सिरम इन्स्टिट्यूटला प्रतिलस केवळ 150 रुपयांचा नफा मिळत आहे.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
येत्या 1 तारखेपासून भारतात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. कोवीशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटने (SII) आपली लस खासगी रुग्णालयांना 600 रुपयांत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही किंमत पाहिल्यानंतर कोवीशिल्ड ही भारतातच सर्वाधिक महाग असल्याचे दिसून येत आहे. याउलट परदेशात कोवीशिल्डची किंमत कमी आहे.
ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेन्का यांनी संयुक्तपणे कोवीशिल्डची निर्मिती केली होती. त्यानंतर सिरम इन्स्टिट्यूटला या लसीची निर्मिती करण्याचे काम देण्यात आले होते. अदर पुनवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार कोवीशिल्डच्या विक्रीतून सिरम इन्स्टिट्यूटला प्रतिलस केवळ 150 रुपयांचा नफा मिळत आहे.
18 ते 45 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्यांना 50 टक्के साठा हा लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून थेट विकत घ्यायचा आहे. त्यानंतर सिरमने राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांसाठी आपले दर जाहीर केले होते. त्यानुसार कोवीशिल्ड लस राज्यांना 400 रुपये तर खासगी रुग्णालयांना 600 रुपयांना विकण्यात येईल.
सिरम इन्स्टिट्यूट सध्या केंद्र सरकारला 150 रुपयांत एक लस देत आहे. मात्र, हा करार संपल्यानंतर केंद्र सरकारलाही 400 रुपयांनाच लस विकली जाईल, असे सिरम इन्स्टिट्यूटकडून स्पष्ट करण्यात आले.
इतर देशांमध्ये कोवीशिल्ड लसीचा दर?
सौदी अरेबिया- 395 रुपये
दक्षिण आफ्रिका- 395 रुपये
अमेरिका- 300 रुपये
बांगलादेश- 300 रुपये
ब्राझील- 237 रुपये
ब्रिटन- 226 रुपये
युरोपियन देशांमध्ये कोवीशिल्ड लसीची किंमत 162 ते 264 रुपये इतकी आहे.
‘केंद्र सरकारने लस घ्यायला परवानगी दिली पण महिनाभराचा साठा बूक केला’
केंद्र सरकार कोरोना लसींच्या वाटपात दुजाभाव करत असल्याचा आरोप महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून अनेकदा करण्यात येतो. आता 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला मुभा दिल्यानंतर केंद्र सरकारने 50 टक्के लसींचा साठा खरेदी करण्याची जबाबदारी राज्यांवर टाकली आहे. त्यामुळे आता राज्यांना कोव्हीशिल्डचे उत्पादन करणारी सिरम आणि कोव्हॅक्सिन लस तयार करणाऱ्या भारत बायोटेकशी थेट बोलावे लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सिरमच्या अदर पुनावालांशी संपर्क साधून लस पुरवण्याची मागणी केली. तेव्हा अदर पुनावाला यांनी 24 मे सिरममध्ये उत्पादित होणाऱ्या लसी केंद्र सरकारने अगोदरच बूक करून ठेवल्याचे सांगितले. त्यामुळे महाराष्ट्राला सिरम इन्स्टिट्यूटकडून थेट लसी घेण्यासाठी आणखी महिनाभर वाट पाहावी लागणार असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले.