‘ शिक्षकांसाठी कार्यशाळेचे बारामतीतील म ए सो देशपांडे विद्यालयात आयोजन ‘
सत्रात इ. 3 री ते इ. १२ वी पर्यंतची विषय योजना विशद केली
‘ शिक्षकांसाठी कार्यशाळेचे बारामतीतील म ए सो देशपांडे विद्यालयात आयोजन ‘
सत्रात इ. 3 री ते इ. १२ वी पर्यंतची विषय योजना विशद केली
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै.ग.भि.देशपांडे विद्यालयात शिक्षकांसाठी ‘राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४-शालेय शिक्षण – ओळख व कार्यवाही’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटक महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की, शिक्षणाचा व्यावहारिक उपयोग व रोजगार निर्मिती वाढवणारी शैक्षणिक पद्धती आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करून ते यशस्वीपणे राबवणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे.
या कार्यशाळेत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे संचालक मा. राहुल रेखावार व राज्य सुकाणू समिती सदस्य डॉ.श्रीपाद ढेकणे यांनी दृकश्राव्य संदेशाच्या माध्यमातून कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.
तदनंतर प्रथम सत्रात राज्य सुकाणू समिती सदस्य डॉ. मिलिंद नाईक यांनी बीजभाषणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व राज्य अभ्यासक्रम आराखड्याचे महत्त्व विशद केले.
द्वितीय सत्रात वरिष्ठ अधिव्याख्याता प्रा.राजेंद्र वाकडे यांनी राज्य अभ्यासक्रम आराखड्याची विस्तृत ओळख व कार्यवाही या विषयावर शिक्षकांशी संवाद साधला. आराखड्यातील दृष्टीकोन, विविध विषय, तरतुदी, शाळा संस्कृती, वेळापत्रक इ. नवीन बदलाच्या अनुषंगाने सविस्तर विवेचन केले.
तृतीय सत्रात शाळेचे महामात्र व राज्य अभ्यासक्रम आराखडा समिती सदस्य डॉ.गोविंद कुलकर्णी यांनी शालेय विषय व विषय योजना याविषयी सखोल मार्गदर्शन केले. या सत्रात इ. 3 री ते इ. १२ वी पर्यंतची विषय योजना विशद केली. चतुर्थ सत्रात शिक्षकांच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यात आली.
शाला समिती अध्यक्ष श्री. अजय पुरोहित यांनी समारोपीय भाषणामध्ये टीचर या शब्दातील प्रत्येक अक्षरावरून शिक्षकांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे गुण, क्षमता असाव्यात याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले .
याप्रसंगी म ए सो चे नियामक मंडळ सदस्य डॉ.राजीव हजिरनीस,समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी, मएसो परिवारातील सर्व मुख्याध्यापिका,पदाधिकारी व शिक्षक,तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड यांनी केले व या कार्यशाळेच्या आयोजनामुळे बारामती व परिसरातील शाळाना भविष्यात हे धोरण अधिक प्रभावीपणे राबविण्यात मदत होईल असे सूचित केले. सूत्रसंचालन मंजिरी शहा यांनी केले तर रेवती झाडबुके यांनी आभार मानले.