शेतकरी केंद्रबिंदू मानून सहकारी बँकांचे कामकाज व्हावे-उपमुख्यमंत्री अजित पवार
परदेशात शिक्षण घेण्यासाठी २५ लाखापर्यंतचे कर्ज देत आहे.
शेतकरी केंद्रबिंदू मानून सहकारी बँकांचे कामकाज व्हावे-उपमुख्यमंत्री अजित पवार
परदेशात शिक्षण घेण्यासाठी २५ लाखापर्यंतचे कर्ज देत आहे.
बारामती वार्तापत्र
शेतकरी केंद्रबिंदू मानून सहकारी बँकांचे कामकाज व्हावे, तसेच बँकेने शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोऱ्हाळे बु. स्थलांतरीत शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, दि माळेगांव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तम जगताप, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. पवार म्हणाले, पुणे जिल्हा सहकारी बॅंकेने रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही करावी. या भरतीमध्ये जिल्ह्यातील गरजू मुला मुलींना गुणवत्तेनुसार संधी मिळणे आवश्यक आहे. पुणे जिल्हा सहकारी बँक शेतकऱ्यांच्या मुलांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी २५ लाखापर्यंतचे कर्ज देत आहे. नाबार्ड ची परवानगी घेऊन कर्जाची मर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. कोऱ्हाळे बु. शाखा साडे तीन कोटी रुपये नफ्यामध्ये असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
बॅंकेतील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पारदर्शक काम करून ग्राहकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. बँकेत लॉकरच्या सुविधेसोबत सुरक्षिततेची काळजी घेतली गेली पाहिजे,असेही श्री.पवार यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, फक्त ऊस लागवड करण्याऐवजी पाण्याची उपलब्धता पाहूनच पिके घ्यावीत. बारामती तालुक्यातील सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती सहकारी साखर करखान्यानी त्यांच्या कार्यक्षेत्राजवळ असणारी सर्व गावे त्यांच्या हद्दीत जोडावीत. यावर्षी मराठवाड्यात खूप प्रमाणात ऊस गाळपाविना शिल्लक आहे. शासनाने १ मेपासून गाळप होणाऱ्या ऊसाला टना मागे २०० रुपये अनुदान देण्याचे घोषित केले आहे. पुढील वर्षांपासून साखर कारखाने लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, कोऱ्हाळे बु. चे सरपंच रविंद्र खोमणे, कोऱ्हाळे खु. चे सरपंच गोरख खोमणे, ग्रामस्थ उपस्थित होते.
*सिद्धिविनायक हायटेक रोप वाटिका व शेडनेट हाऊसचे उद्घाटन*
राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत अर्थसहाय्यीत हायटेक रोपवाटिका व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कोऱ्हाळे बु. येथील शेतकरी अजित पोमणे
आणि भारती पोमणे यांनी उभारलेल्या शेडनेट हाऊस आणि रोपवाटिकेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तम जगताप आदी उपस्थित होते.
हा स्तुत्य उपक्रम असून रोपवाटिकेचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांनी घ्यावा. अशा प्रकारचे व्यवसाय करून शेतकऱ्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन श्री.पवार यांनी केले. कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
00000