इंदापूर

शेतकऱ्याकडे 25 हजारांची लाच मागणारी महसूल सहाय्यक महिला एसीबीच्या जाळ्यात

इंदापूरात महसूल सहाय्यकावर कारवाई

शेतकऱ्याकडे 25 हजारांची लाच मागणारी महसूल सहाय्यक महिला एसीबीच्या जाळ्यात

इंदापूरात महसूल सहाय्यकावर कारवाई

इंदापूर; प्रतिनिधी

शेतकऱ्याकडून रस्त्यासाठी पंचवीस हजाराची लाच घेतल्याप्रकरणी इंदापूर तहसील कार्यालय येथे महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या कावेरी विजय खाडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रेम वाघमारे यांनी माहिती दिली की, इंदापूर तालुक्यातील तक्रारदार यांच्या वडिलांची 39 गुंठे जमीन आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्याबाबत सन 2020 पासून तहसीलदार यांच्याकडे दावा सुरू आहे. याबाबत तहसीलदार इंदापूर यांची सुनावणी होऊन निकाल देण्याबाबतची प्रक्रिया बाकी होती.

या निकालाची कागदपत्रे तक्रारदाराच्या बाजूने तयार करून द्यावे म्हणून कावेरी विजय खाडे (वय 48, रा. संघवीनगर, भिगवण रोड, बारामती) यांनी 50 हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 25 हजार रुपये देण्याचे ठरले. त्याबाबत संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.28) सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान सापळा रचून संबंधित कावेरी खाडे यांना 25 हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. त्यावरून रात्री उशिरा इंदापूर पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदण्याची प्रक्रिया सुरू होती.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक शीतल जानवे, पोलिस उपाधीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रेम वाघमारे, पोलिस हवालदार कैलास महामुनकर, वनिता गोरे, चंद्रकांत कदम यांनी केली.

Related Articles

Back to top button