शेती पंपांचा वीज पुरवठा तात्काळ चालू करावा ; अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन – हर्षवर्धन पाटील
खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्याची केली मागणी

शेती पंपांचा वीज पुरवठा तात्काळ चालू करावा ; अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन – हर्षवर्धन पाटील
खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्याची केली मागणी
इंदापूर : प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम बंद करून करून, शेती पंपांचा वीज पुरवठा तात्काळ चालू करावा अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.
नुकतेच इंदापूर येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेती पंपाचा वीज पुरवठा सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलन प्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोबाईलद्वारे आंदोलकांशी संवाद साधत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. या आंदोलनप्रसंगी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन हर्षवर्धन पाटील व मान्यवरांना दिले होते. मात्र चार दिवस झाले तरी वीज पुरवठा पूर्ववत सुरु केलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्याची चेष्टा करू नका, शांत असलेल्या शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ देऊ नका, असा इशाराही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.
सध्या मुबलक पाणी आहे पण वीज तोडणीमुळे शेतातील उभी पिके जळून चालल्याने, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे व त्रास देण्याचे काम सध्या महाविकास आघाडी सरकार करीत आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले राज्यमंत्री हे शेतकऱ्यांचे वीज तोडणी बाबत अजूनही गप्प आहेत, अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली. शेतकऱ्यांना महावितरणकडून आलेली बिले दुरुस्त करणे व दुरुस्तीचे बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना हप्ते पाडून देणे गरजेचे आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. सध्या शेतकरीवर्ग आर्थिक अडचणीत असल्याने महाविकास आघाडी सरकारने शेतीपंपाचा वीज पुरवठा विना अट तात्काळ सुरु करावा, अन्यथा भाजपच्या वतीने पुन्हा तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा स्पष्ट इशारा हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.