आपला जिल्हास्थानिक

श्रीराम मंदिरात यंदाचा श्रीराम जन्मोत्सव अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

भाविकांना स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणात दर्शन घेता आले.

श्रीराम मंदिरात यंदाचा श्रीराम जन्मोत्सव अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

भाविकांना स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणात दर्शन घेता आले.

बारामती वार्तापत्र 

श्रीराम नगर, भिगवण रोड, जाळोची येथील वै. भगवानराव बाबुराव तावरे यांनी स्थापन केलेल्या श्रीराम मंदिरात यंदाचा श्रीराम जन्मोत्सव अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, दिनांक १९ मार्च २०२६ रोजी या उत्सवाची सुरुवात झाली होती.

या उत्सवाच्या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संगीत तुलसी रामायण, भजन, कीर्तन, हरिपाठ, जागर, भारूड, काकडा, महापूजा, होम-हवन अशा कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. तसेच ‘श्रीराम नाम सप्ताह’ आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये दररोज विविध कीर्तनकार आणि प्रवचनकारांनी आपली सेवा सादर केली.

उत्सवातील मुख्य आकर्षण ठरले ते श्रीराम जन्मोत्सव सोहळा. या दिवशी पारंपरिक पद्धतीने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पालखी सोहळ्यात शेकडो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संपूर्ण परिसर “जय श्रीराम”च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.

श्रीराम नवमीच्या दिवशी ह.भ.प. कृष्ण महाराज मेहुणकर यांचे श्रीराम जन्मावरील कीर्तन झाले. त्यांच्या प्रभावी आणि ओजस्वी वाणीमुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. याशिवाय सप्ताहभर विविध कीर्तनकारांनी भक्तीमय कार्यक्रम सादर करून वातावरण अधिकच रंगतदार केले.

श्रीराम नगर तसेच बारामती पंचक्रोशीतील हजारो रामभक्तांनी मंदिरात येऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. भाविकांची मोठी गर्दी असूनही व्यवस्थापन सुयोग्य ठेवण्यात आले होते.
या श्रीराम नाम सप्ताहाची सांगता ह.भ.प. संजय महाराज सायकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असल्याची माहिती ऍड. हरीश तावरे, श्री पांडुरंग तावरे आणि ऋषिकेश तावरे यांनी दिली.

दरम्यान, या संपूर्ण सप्ताहादरम्यान बारामती नगरपालिकेने परिसरात स्वच्छता राखण्यासाठी विशेष लक्ष दिले, त्यामुळे भाविकांना स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणात दर्शन घेता आले.
एकूणच, श्रीराम जन्मोत्सवाने श्रीराम नगर परिसरात भक्ती, श्रद्धा आणि सांस्कृतिक एकात्मतेचे सुंदर दर्शन घडवले.

Back to top button