संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला मंत्रालयात पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले त्यांच्या सत्यशोधक विचारांचे स्मरण
संत गाडगेबाबा हे सत्यशोधक विचारांचे क्रांतिकारी समाजसुधारक होते.
संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला मंत्रालयात पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले त्यांच्या सत्यशोधक विचारांचे स्मरण
संत गाडगेबाबा हे सत्यशोधक विचारांचे क्रांतिकारी समाजसुधारक होते.
मुंबई,प्रतिनिधी
‘मी कुणाचा गुरु नाही, माझा कुणी शिष्य नाही’ हे सांगणाऱ्या संत गाडगेबाबांनी जीवनातील प्रत्येक बाबीकडे चिकित्सक, डोळसपणे बघण्याचा संदेश दिला. संत तुकाराम महाराज, महात्मा ज्योतीबा फुले यांच्यासारख्या महामानवांचे सुधारणावादी, सत्यशोधक विचार, लोकसेवेचे कार्य त्यांनी समर्थपणे पुढे नेले. प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले आहे.
संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संत गाडगेबाबांचे स्मरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “संत गाडगेबाबा हे विज्ञानवादी विचारांचे कृतीशील संत, समाजसुधारक होते. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता, अनिष्ठ रुढी-परंपरांच्या निर्मुलनासाठी त्यांनी जीवनभर कार्य केलं. कुष्ठरुग्णांसह समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांची सेवा केली. स्वत: चिंध्या पांघरल्या. जाणीवपूर्वक गरीबीत जगले, मात्र, सर्वसामान्यांसाठी शाळा, धर्मशाळा, घाट, रुग्णालये, अनाथालये, अन्नछत्रांसारख्या सेवांची उभारणी केली.
संत गाडगेबाबा हे सत्यशोधक विचारांचे क्रांतिकारी समाजसुधारक होते. अडाणी राहू नका. अंधश्रद्धा ठेवू नका. कर्ज काढू नका. व्यसन करु नका. जातीभेद-अस्पृश्यता पाळू नका. माणसात देव शोधा, दीन-दुबळे, रंजले-गांजले, अनाथ-अपंगांची सेवा करा, अशा सोप्या भाषेत त्यांनी समाजप्रबोधनाचं कार्य केले. संत गाडगेबाबा हे कृतीशील संत होते. प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राच्या उभारणीत संत गाडगेबांच्या विचारांचं, कार्याचं मोठे योगदान आहे. त्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करूया,असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.