“संत सावतामाळी की जय” च्या जयघोषाने इंदापूर शहर दुमदुमले, पुण्यतिथी निमित्त शहरात भव्य मिरवणूक
730 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

“संत सावतामाळी की जय” च्या जयघोषाने इंदापूर शहर दुमदुमले, पुण्यतिथी निमित्त शहरात भव्य मिरवणूक
730 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी
इंदापूर;प्रतिनिधि
कांदा, मुळा भाजी । अवघी विठाई माझी ॥
लसण मिरची कोथंबिरी । अवघा झाला माझा हरि ॥
स्वकर्मात व्हावे रत । मोक्ष मिळे हातो हात ॥
सावत्याने केला मळा । विठ्ठल देखियला डोळा ॥
थोर संत सावता महाराज यांनी त्यांच्या कार्यातून श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. याच श्रम प्रतिष्ठेचा सन्मान करण्यासाठी इंदापूर येथील संत सावता माळी ट्रस्ट इंदापूर यांच्यातर्फे सावतामाळी मंदिरापासून आज (दि.23) बुधवारी सकाळी 8 वा भगतसिंग चौक, बावडावेस माळी गल्ली, नेहरू चौक, मुख्य बाजारपेठ, खडकपुरा, नगरपालिका,महात्मा फुले नगर रोड येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. संत सावतामाळी मंगल कार्यालय येथे किर्तन व महाप्रसादाने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. याप्रसंगी माजी सभापती प्रवीण माने,नगराध्यक्षा अंकिता शहा, मा.नगरसेवक भरतशेठ शहा,प्रा.कृष्णाजी ताटे,महारुद्र पाटील,प्रमोद राऊत,अर्शद सय्यद,उपस्थित होते.या शोभायात्रेत सावतामाळी कि जय.. च्या घोषणा देण्यात आल्या. घोषणेने आसमंत दणानून गेला होता.
संत सावता महाराज (संत सावता माळी) यांचा काळ वर्ष १२५० ते १२९५ दरम्यानचाचा आहे. सावता माळी हे ‘कर्तव्य आणि कर्म करीत राहणे, हीच खरी ईश्वरसेवा’, अशी शिकवण देणारे संत होते. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते एका अभंगात म्हणतात.
ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतांनाच काया-वाचे-मने ईश्वरभक्ती करता येते. हा अधिकार सर्वांना आहे. ‘न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’ असे ते म्हणत. धार्मिक प्रबोधनाचे आणि ईश्वरभक्तीच्या प्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने अन् ‘व्रत’ म्हणून आचरिले. समरसता आणि अलिप्तता यांतील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो.
शहरातील आजच्या मिरवणुकीमध्ये महिलांचा समावेश मोठया प्रमाणात होता. यावेळी पांडुरंग (तात्या) शिंदे,महादेव शिंदे,पांडुरंग शिंदे,दत्तात्रय शिंदे,रमेश शिंदे,मयूर शिंदे,भारत शिंदे,मेजर महादेव बोराटे,,मनोहर राऊत,युवराज शिंदे,अजिनाथ शिंदे,मोहन राऊत,स्वप्नील राऊत,मेजर किसन बोराटे,सुहास राऊत,गणेश राऊत,राजेंद्र राऊत, ह.भ.प बलभीम राऊत आदि मान्यवर उपस्थित होते.