“संधी मिळाली तर गटाचा चेहरामोहरा बदलू” – सोनाली जाधव
महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देत सर्वांगीण विकासाचा ठाम निर्धार

“संधी मिळाली तर गटाचा चेहरामोहरा बदलू” – सोनाली जाधव
महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देत सर्वांगीण विकासाचा ठाम निर्धार
इंदापूर, आदित्य बोराटे
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी – शेळगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सोनाली तुषार जाधव यांनी विकास, महिला सक्षमीकरण आणि थेट जनसंपर्काच्या माध्यमातून गटाचा काया पालट करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, त्यांच्या उमेदवारीमुळे गटात नव्या नेतृत्वाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
निमगाव केतकी – शेळगाव जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सोनाली तुषार जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मतदारांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. तुषार जाधव यांच्या पत्नी तसेच देवबा जाधव आणि अंकुश जाधव यांच्या सून असलेल्या सोनाली जाधव यांनी, कुटुंबाने आजवर राबवलेल्या विकासकामांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, तसेच देवबा जाधव, अंकुश जाधव आणि तुषार जाधव यांनी निमगाव केतकी – शेळगाव गटात केलेल्या विविध विकासकामांमुळे नागरिकांना सुविधा मिळाल्या आहेत. या कामांपासून प्रेरणा घेत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख विकास घडवून आणण्याचा आपला प्रयत्न राहील, असे सोनाली जाधव यांनी सांगितले.
सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी कायम जनतेशी नाते जोडले आहे. बचत गट आणि पतसंस्था यांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत. महिलांसाठी विविध कार्यक्रम, प्रशिक्षण शिबिरे आणि जनजागृती उपक्रम राबवून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

आरोग्याच्या दृष्टीनेही त्यांनी पुढाकार घेतला असून, अलीकडच्या काळात कॅन्सरविषयक जनजागृती परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. कॅन्सरची सुरुवात कशी होते, त्याची लक्षणे कोणती, तपासणीचे महत्त्व आणि वेळेवर उपचार केल्यास होणारे फायदे याबाबत महिलांना सविस्तर माहिती देण्यात आली. अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
निमगाव केतकी – शेळगाव गटात महिला सक्षमीकरणाबरोबरच पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकास या मुद्द्यांना प्राधान्य देण्यात येईल, असे स्पष्ट करत सोनाली जाधव यांनी जिल्हा परिषदेमार्फत काम करण्याची संधी मिळाल्यास गटाचा सर्वांगीण विकास करून खऱ्या अर्थाने काया पालट घडवून आणू, असा ठाम विश्वास व्यक्त केला.






