संविधान दिन हा लोकोत्सव व्हावा : ॲड.समीर मखरे
भिमाई आश्रमशाळेत संविधान दिन उत्साहात साजरा
इंदापूर : प्रतिनिधी
भारताच्या घटना समितीने अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. त्या घटनेला आज रोजी ७२ वर्ष पूर्ण होत असून २६ नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करून लोकशाही संपन्न करु या, असे प्रतिपादन इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे सचिव ॲड.समीर मखरे यांनी केले.संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात हा कार्यक्रम संपन्न झाला. मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, ज्युनिअर कॉलेज, मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ॲड. मखरे पुढे म्हणाले की, २६ जानेवारी १९५० पासून या घटनेची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी सुरू झाली आणि देशांमध्ये लोकशाही व्यवस्था उभी केली. त्याचे उत्तरदायित्व म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. संविधान दिन हा केवळ शासकीय पातळीवरच साजरा न होता, तो लोकोत्सव व्हावा असे यावेळी ॲड. समीर मखरे यांनी सांगितले.
“माझे संविधान, माझा अभिमान” उपक्रमांतर्गत विविध स्पर्धा घेऊन शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करुन शाळेत राबविल्याबद्दल संस्था प्रमुख शकुंतला मखरे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करत उपस्थितांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.प्रसंगी भारतीय संविधानातील उद्देशिकेच्या प्रतिमेचे पूजन इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे यांच्या हस्ते, तर घटनाकार विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे व संचालक गोरख तिकोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हिरालाल चंदनशिवे यांनी संविधानातील उद्देशिकेचे प्रकट वाचन विद्यार्थ्यांसमोर केले.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी व विद्यार्थी,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.कार्यक्रम प्राचार्या अनिता साळवे यांच्या मार्गदर्शाखाली पार पडला.