राजकीय

सहकारात सहकाऱ्यांचाच असहकार; सत्तासंघर्षात ‘शेतकरी सभासद’ हतबल

सहकारात सहकार्याऐवजी असहकाराचे चित्र निर्माण होऊ नये,

सहकारात सहकाऱ्यांचाच असहकार; सत्तासंघर्षात ‘शेतकरी सभासद’ हतबल

सहकारात सहकार्याऐवजी असहकाराचे चित्र निर्माण होऊ नये

बारामती  वार्तापत्र 

सहकार क्षेत्रातील एका नामांकित साखर कारखान्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडींमुळे संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकरी सभासदांच्या मालकीची असलेली संस्था ही सहकाराच्या तत्त्वांवर चालविली जाणे अपेक्षित असताना, काही संचालकांमध्ये संस्थेवर वर्चस्व प्रस्थापित करण्याची चढाओढ सुरू असल्याची चर्चा कारखाना परिसरात रंगली आहे.

कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. हा विषय पूर्णपणे कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रियेशी संबंधित असला तरी त्याचे राजकारण होत असल्याची भावना अनेक सभासद व्यक्त करत आहेत. दरम्यान, संबंधित वरिष्ठ अधिकारी स्वतःहून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती समोर येत आहे.

सहकारी संस्थांमध्ये संचालक मंडळ हे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी असते. मात्र काही ठिकाणी संचालक म्हणजेच संस्थेचे मालक असल्याचा आव आणला जात असल्याची टीका होत आहे. यामुळे प्रशासनावर अनावश्यक दबाव निर्माण होत असून संस्थेच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे.

सध्या सत्ताधारी गटाला आपले वर्चस्व कायम ठेवण्याची चिंता आहे, तर विरोधी गटाला सत्तेची संधी मिळविण्याची आस लागली आहे. या सत्तासंघर्षात मात्र शेतकरी सभासदांचे प्रश्न, ऊस उत्पादकांच्या अपेक्षा आणि संस्थेच्या विकासाचा मुद्दा मागे पडत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

कारखान्याची उभारणी शेतकऱ्यांच्या घामातून आणि विश्वासातून झाली आहे. त्यामुळे संस्थेचे हित, आर्थिक स्थैर्य आणि सभासदांचा विश्वास यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. सहकाराच्या मूलभूत मूल्यांना बाजूला ठेवून सुरू असलेली अंतर्गत रस्सीखेच दीर्घकाळ चालल्यास त्याचा फटका संस्थेला आणि पर्यायाने शेतकरी सभासदांनाच बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

सहकारात सहकार्याऐवजी असहकाराचे चित्र निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा सभासदांमधून व्यक्त होत आहे.

Back to top button