सहानुभूतीसाठी तुम्ही कोर्टात गेला का?’,अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना संतप्त सवाल; शरद पवारांवरही साधला निशाणा
हे जे आहे ना भावनिक करायचं, हे बरोबर नाहीये.
सहानुभूतीसाठी तुम्ही कोर्टात गेला का?’,अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना संतप्त सवाल; शरद पवारांवरही साधला निशाणा
हे जे आहे ना भावनिक करायचं, हे बरोबर नाहीये.
बारामती वार्तापत्र
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे.
दरम्यान प्रचाराला वेग आला आहे. अशातच बारामती विधानसभा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आला आहे.
अजित पवार आणि शरद पवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. युगेंद्र पवार यांच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवारांनी तुमच्यामुळे कोर्टाची पायरी चढावी लागली असा प्रश्न उपस्थित केला तर सुप्रिया सुळे यांनी मुलीचा वाढदिवस कोर्टात साजरा करावा लागला म्हणत अजित पवारांना लक्ष केले होते.
त्यावरून आता अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. शरद पवारांच्या विधानावर बोलताना अजित पवार म्हणाले, ‘अजिबात नाही. सगळी संघटना बहुमताने आली. निवडणूक आयोगाने निर्णय दिला. तुम्ही एकिकडे काय म्हणता जनतेच्या दारात जा. तुम्ही म्हणता न्याय व्यवस्थेकडे जा, न्याय व्यवस्था जो निर्णय देईल, मान्य करा. निवडणूक आयोग जो निर्णय देईल, ते मान्य करा. त्याच पद्धतीने आम्ही गेलो, आम्ही काय चूक केली?
न्यायालयात प्रकरण सुरू आहे. तिथे आपण जाऊन काय करणार आहे? कोर्टात तुमच्या वतीने वकील भांडणार. माझ्या वतीने वकील भांडणार. आपण नुसते. वकील काय बोलतो ते बघतो. मग सहानुभूतीसाठी तुम्ही कोर्टात गेला का?’, असा उलट प्रश्न अजित पवारांनी शरद पवारांना केला आहे.
ते पुढे म्हणाले, ‘ सुप्रिया पण नेहमी सांगते, माझ्या मुलीचा वाढदिवस होता आणि मला कोर्टात जावं लागलं. अग मग वाढदिवस करायचा, कशाला कोर्टात गेली? त्या दिवशी, एका तारखेला नसती कोर्टात गेली, तर चाललं असतं. वकिलाला सांगायचं की, आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे. पुढची तारीख माग. पुढची तारीख मागता येते ना?
हे जे आहे ना भावनिक करायचं, हे बरोबर नाहीये. रेवती माझीच मुलगी असल्यासारखी आहे. पण, माझ्या मुलीचा वाढदिवस होता. मी कोर्टात गेले. मी तिथे बसले. तिथे तिला यायला सांगितलं. असं नका ना करू? ठीक आहे. माझी वेगळी मते आहेत. तुमची वेगळी मते आहेत.
पण, या पद्धतीने… मी कुणालाच कोर्टात जायला सांगितलं नाही. मी कोर्टाची पायरी अजून पर्यंत चढलो नाही. मी दिल्लीत गेलेलो बघितलं का? आम्ही वकिलांना पैसे देतो, तेही पैसे देतात; वकिलांनी त्यांची बाजू मांडली पाहिजे’, असे म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.