सान्वी प्रिया अमरेंद्र महाडीक हिची दुहेरी कामगिरी – जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक
तब्बल १७६ शाळांमधील २६६० विद्यार्थी सहभागी

सान्वी प्रिया अमरेंद्र महाडीक हिची दुहेरी कामगिरी – जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक
तब्बल १७६ शाळांमधील २६६० विद्यार्थी सहभागी
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदिर, पिंपळी हिची विद्यार्थिनी सान्वी प्रिया अमरेंद्र महाडीक हिने अल्पावधीतच दुहेरी यश संपादन करत आपल्या शाळेचा आणि तालुक्याचा मान उंचावला आहे. तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धेतून निवड झाल्यानंतर तिने जिल्हास्तरावर प्रभावी ठसा उमटवत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
बालरंगभूमी परिषद आयोजित तालुकास्तरीय आंतरशालेय नाट्यछटा स्पर्धेत पाचवी ते सातवी गटामध्ये तब्बल १४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कठीण स्पर्धेतून सान्वीने “ऑफ पिरियडची मजा” ही नाट्यछटा सादर करून प्रेक्षक व परीक्षकांची दाद मिळवली. तिच्या प्रभावी अभिनयामुळे परीक्षकांनी तिला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडले. बारामती तालुक्यातून एकूण १४ मुलींची निवड झाली असून त्यात सान्वीचाही समावेश होता.
यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धा आज, २४ ऑगस्ट रोजी निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेत पार पडली. बालरंगभूमी परिषद, पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड शाखा आयोजित कै. मनीषा भाऊसाहेब भोईर स्मृती नाट्यछटा स्पर्धा २०२५ मध्ये तब्बल १७६ शाळांमधील २६६० विद्यार्थी सहभागी झाले. स्पर्धा २७ केंद्रांवर घेण्यात आली होती. त्यातून निवड होऊन ३२५ स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले.
५ वी ते ७ वी या तिसऱ्या गटातील ११० स्पर्धकांमध्ये सान्वीने उत्कृष्ट कामगिरी सादर करत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले.
पारितोषिक अभिनेते व दिग्दर्शक डॉ. संजीवकुमार पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, पिंपरी चिंचवड शाखेचे मनोज डाळिंबकर, दिपाली शेळके (अध्यक्ष, बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा), गौरीताई लोंढे (अध्यक्ष, बालरंगभूमी परिषद पिंपरी चिंचवड शाखा) आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
सान्वीच्या तयारीत शाळेतील शिक्षिका ज्योती दिसले व अर्चना देव यांचे मार्गदर्शन तसेच विभाग प्रमुख लीला शेट्टी यांचे सातत्याने प्रोत्साहन लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका तनुश्री गोरे यांनी सान्वीचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सान्वीचे हे यश तिच्या मेहनतीचे, समर्पणाचे आणि योग्य मार्गदर्शनाचे फलित असल्याचे शिक्षक व पालकांनी सांगितले.
या कामगिरीमुळे विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदिर, पिंपळी चा मान उंचावला असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.