सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टीव्हिटी सेंटर बारामती
कोरोनाचे सावट असतानाही हे सेंटर केवळ 2 वर्षांत बांधून पूर्ण केले गेले.
सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टीव्हिटी सेंटर बारामती
कोरोनाचे सावट असतानाही हे सेंटर केवळ 2 वर्षांत बांधून पूर्ण केले गेले.
बारामती वार्तापत्र
राजीव गांधी सायन्स टेक्नोलॉजी कमिशन, महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला सन २०१९ मध्ये सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टीव्हिटी सेंटर मंजूर झाले. हे सेंटर मिळण्यासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निलेश नलावडे, संस्थेचे सल्लागार प्रा. संतोष भोसले, शारदाबाई पवार विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक श्री. सुर्यकांत मुंढे, सेंटरच्या व्यवस्थापक हीना भाटीया, प्रा.सोनाली सस्ते, प्रा.जया तिवारी यांनी आयोगासमोर आणि टाटा ट्रस्टच्या समितीसमोर सादरीकरण केले आणि ग्रामीण भागातील एक अद्ययावत सायन्स सेंटर बारामती येथे मंजूर झाले. कोरोनाचे सावट असतानाही हे सेंटर केवळ 2 वर्षांत बांधून पूर्ण केले गेले.
हे सेंटर केवळ अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टपुरते मर्यादित राहणार नसून पुणे आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना याचा लाभ होण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा येथे तयार केलेल्या आहेत. या सेंटरचा उn~घाटन समारंभ संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि १६ जून २०२२ रोजी संपन्न होत आहे.
या कार्यक्रमास अनेक मान्यवरांबरोबर आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ मा.अनिल काकोडकर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार, खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, प्रसिध्द उद्योजक श्री. गौतम अदानी, राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, भारतातील सर्वात तरूण शास्त्रज्ञ गोपालजी हे उपस्थित राहणार आहेत.
राज्यभरातील खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी संधी देऊन त्यांच्या नवकल्पना विकसित केल्या जातील. यासाठी एक्सपोजर-एक्सपेरीमेंट-एक्सप्लोरेशन या “३ई” तत्वावर सायन्स सेंटर काम करेल. सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान क्षेत्रातील नामांकित संस्थामध्ये नेऊन विज्ञानाबद्दलची आवड वाढवणे आणि संशोधन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल.
यासाठी शाळांना सहज करता येण्याजोग्या प्रयोग साहित्याच्या किटचे वाटप आणि प्रशिक्षण दिले जाईल.या सर्व सोयींचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्याना व्हावा यासाठी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट नेहमीच प्रयत्नशील राहतील.
भविष्यात विद्यार्थ्यांना या केंद्रात उपलब्ध असणाऱ्या फन सायन्स गॅलरी, अॅग्रीकल्चर गॅलरी, ३डी थिएटर, इनोव्हेशन हब, व्हर्चुअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी यांसारखे तंत्रज्ञान पाहायला अनुभवायला मिळेल. जपान, कोरिया,चीन या देशांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाधिष्टीत शिक्षणव्यवस्था आहे. त्यामुळे तेथील तरूण संशोधक ऑटोमोबाईल, टेलीकॉम, होम अप्लायन्सेस या क्षेत्रात उत्तरोत्तर भरीव प्रगती करीत आहेत.
याच विचारातून कोडींग, डेटा सायन्स, डिजिटल मार्केटिंग, डिजाईन थिंकिंग या तंत्रज्ञानाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही या सेंटरमध्ये मिळेल याची व्यवस्था केली आहे.यातून स्वदेशी उत्पादन करणारे भावी तंत्रज्ञ आणि संपूर्ण जगाला पुरवठा करतील अशा कंपन्या भारतात उभ्या करणारे भावी उद्योजक तयार होतील.
पुढील काळात राज्यभरातील शालेय शिक्षकांना नेदरलँड, कोस्टारिका अशा विविध देशांमधील आधुनिक शिक्षण पद्धतीचे प्रशिक्षण देण्याचीही सुविधा करण्यात आली आहे यासाठी नेदरलँड येथील हान या विद्यापीठाशी संस्थेने करार केला असून तेथील तज्ज्ञ प्रशिक्षक येथे प्रशिक्षण देतील. या सगळ्याबरोबरच विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा, परीषदा, चर्चासत्रे देशातील तरूण शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधी मुलांना देण्याचा मानस आहे.
हे केंद्र उभारताना महाराष्ट्रातील विज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक नामवंत संस्था आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले आहे.यांत प्रामुख्याने नेहरू सायन्स सेंटर – मुंबई, होमी भाभा विज्ञान केंद्र – मुंबई, अगस्त्या इंटरनॅशनल- कुप्पम, मुक्तांगण एक्सप्लोरेटरी- पुणे, कॅडमॅक्स – नाशिक यांच्या बरोबरच तसेच आधुनिक तंत्रज्ञान जसे कि रोबोटिक्स, कोडींग, व्हर्चुअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी इथे आणण्यासाठी संस्था प्रयत्नशील असेल.
वेगवेगळ्या विषयांच्या एक्सप्लोरेटरी लॅबची साहित्यनिर्मिती संस्थेच्या वेगवेगळ्या विभागातील शिक्षक, प्राध्यापकांनी देशातील अनेक तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.
या सायन्स सेन्टरच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने दि.15 जून ते १७ जूनपर्यंत राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यातील २५० प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. तसेच वेगेवेगळ्या तज्ज्ञ व्यक्तींचे फन सायन्स शो, जादूचे प्रयोग, विज्ञान कार्यशाळा, स्टँड अप कॉमेडी अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी मुलांसाठी असेल. कार्यक्रमासाठी राज्यभरातील 6000 विद्यार्थी आणि ६०० शिक्षक उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती संस्थेचे चेअरमन श्री. राजेंद्र पवार यांनी दिली.