सायबर सुरक्षेसाठी विद्यार्थ्यांचे पटनाट्य गाजले
विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचा ‘आला नवा जमाना मोबाईलचा दिवाना’ हा प्रयोग ठरला प्रेरणादायी

सायबर सुरक्षेसाठी विद्यार्थ्यांचे पटनाट्य गाजले
विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचा ‘आला नवा जमाना मोबाईलचा दिवाना’ हा प्रयोग ठरला प्रेरणादायी
बारामती वार्तापत्र
हॅप्पी स्ट्रीट, बारामती येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी सादर केलेले पटनाट्य विशेष आकर्षण ठरले. ‘आला नवा जमाना, मोबाईलचा दिवाना’ या शीर्षकाखाली सादर करण्यात आलेल्या या पटनाट्यातून मोबाईलच्या अति वापरामुळे होणारे सायबर गुन्हे आणि त्यापासून बचाव यावर प्रकाश टाकण्यात आला.
या कार्यक्रमास खासदार सौ. सुनेत्रा (वहिनी) अजित पवार, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलिस निरीक्षक वैशाली पाटील तसेच पोलीस दलातील अधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमाअंतर्गत सादर करण्यात आलेले हे पटनाट्य प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. विद्यार्थ्यांनी प्रभावी अभिनय, संवाद आणि सादरीकरणाद्वारे सायबर जागरूकतेचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
पटनाट्यानंतर सौ. सुनेत्रा (वहिनी) अजित पवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना असेच सादरीकरण पुढेही सातत्याने करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी सांगितले की, “सध्याच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असून, युवकांनीच समाजात जनजागृती घडवणे ही काळाची गरज आहे.”
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, यामुळे सायबर सुरक्षिततेबाबत समाजात अधिक सजगता निर्माण होण्यास मदत होईल, असे उपस्थितांनी नमूद केले.