सावधान ! आता ढाबा, हॉटेलात दारू प्याल, तर कोर्टाची पायरी चढावी लागणार
तब्बल १ हजार ५ जणांवर कारवाई

सावधान ! आता ढाबा, हॉटेलात दारू प्याल, तर कोर्टाची पायरी चढावी लागणार
तब्बल १ हजार ५ जणांवर कारवाई
बारामती वार्तापत्र
ढाब्यांवर दारू पिणे आणि विक्री करणे कायद्याने गुन्हा असून, अलीकडील काळात हे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासातून समोर आले आहे. यामुळेच विभागाकडून कडक कारवाई केली जात असून, गेल्या चार महिन्यांत पुणे विभागाने तब्बल १ हजार ५ जणांवर कारवाई केली असून, ३४६ ढाबा मालकांना दंड ठोठावण्यात आला आहे.
ढाब्यांवर केवळ जेवणाची परवानगी असते. रेस्टॉरंट अँड बार वगळता इतर कोणत्याही ठिकाणी दारू पिणे कायद्याने गुन्हा मानला जातो. यासाठी आवश्यक त्या परवानग्यांची पूर्तता झाली पाहिजे. मात्र, अनेक ठिकाणी बाहेरून दारू आणून ढाब्यांवर पिण्याचे प्रकार वाढले असून, काही ढाबा चालक स्वतःही दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे छाप्यांमध्ये आढळून आले आहे.
चार महिन्यांत मोठी कारवाई
जानेवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत पुणे उत्पादन शुल्क विभागाने १,००५ व्यक्तींवर कारवाई केली असून, ३४६ ढाबा चालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एकूण १ लाख ६८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, सुमारे २१ लाख २४ हजार २५० रुपयांचा अवैध मद्यसाठा व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
परवाना आवश्यक, तोही ऑनलाईन
दारू विकत घेणे, बाळगणे आणि पिणे यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एक दिवसाचा, एक वर्षाचा आणि आयुष्यभराचा परवाना दिला जातो. हा परवाना आता ऑनलाईन मिळवता येतो. यासाठी ५ रुपये ते १ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. देशी दारूसाठीचा एक दिवसाचा परवाना केवळ १ रुपयात उपलब्ध आहे.
ढाब्यांवर दारू विक्री किंवा पिण्यास बंदी आहे. असे प्रकार निदर्शनास आल्यास एक्साइज विभागाच्या भरारी पथकांद्वारे तत्काळ कारवाई केली जाते. अवैध मद्यसाठा, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवरही नियमितपणे कारवाई सुरू आहे