सावधान सैन्य दलात नोकरीच्या आमिशाने फसवणूक होत आहे
बेरोजगारांना लक्ष्य केले जात आहे
बारामती:वार्तापत्र भारतीय
सैन्यदलात नोकरीच्या आमिषाने पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा, वाशीम, जळगाव तसेच मराठवाडा विदर्भ जिल्हयातील दहावी, बारावी शिक्षण झालेल्या बेरोजगार तरूणांना तेथील ओळखीचे एजंटमार्फत भारतीय सैन्यदलात नोकरी लावण्याचे खोटे अमिष दाखवून प्रत्येकी २ ते ४ लाख याप्रमाणे कोट्यावधी रुपये घेवून फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक घटना समोर आला आहे. याप्रकरणी किशोर दादा जाधव (रा.कुरकुंभ ता.दौंड जि.पुणे) येथील तरुणाने फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीवरुन भिगवण पोलीस ठाण्यात आरोपी नितीन तानाजी जाधव (रा.कल्पनानगर, बारामती) व आकाश काशिनाथ डांगे (रा.भाडळी बु॥, ता.फलटण जि.सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्हयातील फिर्यादी तरुणाची सैन्यदलात नोकरीच्या आमिषाने फसवणूक झाली होती. त्याने पुणे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांना फसवणुकीच्या प्रकाराची माहिती दिली होती. हा प्रकार गंभीर स्वरुपाचा असल्याने पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर तपासामध्ये फिर्यादीसह इतर अनेक बेरोजगार तरुणांची सैन्यदलात नोकरीच्या आमिषाने फसवणूक झाल्याचे व यामागे मोठे बोगस रॅकेट असल्याची माहिती समोर आली.
पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी गुन्हा गंभीर स्वरूपाचा व त्याची व्याप्ती महाराष्ट्रभर असल्याने गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश चव्हाण, अनिल काळे, रविराज कोकरे, महेश गायकवाड, निलेश कदम, उमाकांत कुंजीर, रौफ इनामदार, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरूनाथ गायकवाड, संतोष सावंत, अक्षय नवले यांनी महत्वाची कामगिरी केलेली आहे.
चारच दिवसांपूर्वी झाले युवकांना गंडा घालणाऱ्या आरोपीचे लग्न आकाश डांगे याने अल्प कालावधीच बेरोजगार युवकांना गंडा घालून कोट्यावधी रुपयाची माया गोळा केली होती. काही वर्षांपूर्वी गरीबीत दिवस काढलेला आकाश हा फलटण पंचक्रोशीत आलिशान गाडया फिरवत पैशाची उधळण करत होता. नुकताच त्याने मोठा अलिशान बंगला बांधला होता.
त्याच्याकडे एवढा पैसा अचानक कोठून आला? याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा होती. परंतु हा महाठग आहे याची कोणाला कल्पनाच नव्हती. आकाश डांगे याचे चार दिवसा पूर्वीच लग्न झाले असून त्याचे गैरकृत्यामुळे त्याला पोलीस कोठडीत जाण्याची वेळ आली आहे.