इंदापूरमध्ये वाढत्या वीज बिलाच्या विरोधात सरकारला कंदील भेट
महागाई गगनाला भिडल्याने वीज बिल माफ करण्याची मागणी

इंदापूरमध्ये वाढत्या वीज बिलाच्या विरोधात सरकारला कंदील भेट
महागाई गगनाला भिडल्याने वीज बिल माफ करण्याची मागणी
इंदापूर : प्रतिनिधी
जनता लॉकडाउन व कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमुळे संकटात सापडली असून दुसरीकडे महागाई गगनाला भिडली आहे.त्यामुळे वीज बिल माफ करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या संदर्भात बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व महिला आघाडीच्या वतीने बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड.राहुल मखरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि.६) इंदापूर येथे तहसीलदार यांना कंदील भेट देत अनोख्या पध्दतीने मागणी करण्यात आली.
वीज बिल माफीचा तसेच मोफत वीज देण्याचा नारा देऊन महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी सरकारे सत्तेवर आली.
परंतु सत्तेमध्ये आल्यानंतर वाढत्या वीज बिला बाबत तसेच वीज बिल आकारणीच्या, वीज बिल मोफत देण्यासह लोडशेडिंग संदर्भामध्ये कोणतेही सरकार आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये बोलताना दिसत नाही. या उलट महाराष्ट्रामध्ये कांग्रेस,भाजपा आणि आता महाविकास आघाडी चे सरकार बनले आहे, त्या सरकारने सामान्य वीज ग्राहकांची मोठ्या प्रमाणामध्ये वीज शुल्क आकारून लूट केली आहे आणि करत आहेत. यामध्ये शेतकरी, घरगुती वीज कनेक्शन, व्यापारी या सर्वांची लूट सत्तेवर आलेल्या वेगवेगळी सरकारे करत आहेत. वीज बनवण्यासाठी प्रतियुनिट ६३ पैसे खर्च येतो. वीज बनवत असताना जी वीज गळती होते ते प्रति युनिट ३३ पैसे इतकी असते. नफा व इतर गोष्टी पकडून ही वीज ग्राहकाला साधारण १.९३ पैसे प्रतियुनिट ने दिली पाहिजे. यामध्ये मीटर भाडे सहभागी केल्यास ही रक्कम जवळजवळ २.९३ रुपये प्रति युनिट होते.
परंतु एमपीडीएल मार्फत १०० युनिट पर्यंतचे ५.३४ पैसे प्रति युनिट घेतले जातात. ३०० ते ५०० युनिट पर्यंत ९.८२ पैसे प्रतियुनिट आकारले जातात. ५०० ते १००० पर्यंत १० रु प्रती युनिट च्या दरम्यान पैसे घेतले जातात. १००० युनिटच्या पुढे दहा रुपये प्रतियुनिट घेतले जातात. वीज शुल्क शासन अधिसूचना कायदा दि.२१/१०/२०१६ रोजी युती सरकारमध्ये पास झाला. दि. २४/४/२०२० पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणिबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारने आधीभार रद्द केला पाहीजे.मीटर रीडिंग ३० दिवसाच्या आतमध्ये घेणे गरजेचे आहे. ३० दिवसांपेक्षा जास्त अंतर ठेवल्यास युनिट १०० च्या पुढे गेल्यामुळे अतिरिक्त अधिभार आकारला जातो.
त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर व महाराष्ट्रातील सर्व तहसिल कार्यालयावर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने एकाच दिवशी आंदोलन करण्यात येत असल्याचे बहुजन मुक्ती पार्टीचे इंदापूर तालुका प्रभारी संजय शिंदे यांनी सांगितले.
दोनशे युनिट पर्यंत चे वीज बिल माफ करण्यात यावे, मीटर भाडे कपात करण्यात यावे,वीजेचा स्थिर कर प्राथमिक भावाप्रमाणे दर आकारणी करावी, सक्तीची वीज बिल वसूली तत्काळ थांबवावी, ज्या ग्राहकांनी वीज बिल मार्च २०२० पासून भरले त्यांच्या साठी अभय योजना तयार करावी व पुढील वर्षभरात वीज बिल शून्य पाठवावे, ३० दिवसानंतर रिडिंग घेणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशा विविध मागण्या दिलेल्या निवेदनाद्वारे सरकारकडे करण्यात आल्या आहेत.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग,युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष राहुल शिंगाडे,इंदापूर शहराध्यक्ष संतोष क्षिरसागर,सुरज धाईंजे,इम्रान बागवान,भारत मिसाळ,आझाद सय्यद,नितीन देशमाने,नागेश भोसले,सिद्धार्थ मिसाळ,दादाराम आदलिंग,विशाल जाधव,रोहित ढावरे,वसिम शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.