शैक्षणिक

सी.ए.इन्स्टिट्यूटतर्फे टी.सी.महाविद्यालयात ‘अकाउंटन्सी म्युझियम’चे उद्घाटन

पारंपरिक सरस्वती पूजनाने

सी.ए.इन्स्टिट्यूटतर्फे टी.सी.महाविद्यालयात ‘अकाउंटन्सी म्युझियम’चे उद्घाटन

पारंपरिक सरस्वती पूजनाने

बारामती वार्तापत्र 

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अकाउंटन्सी म्युझियम’चे उद्घाटन उत्साहात पार पडले. लेखांकन शास्त्राचा वैभवशाली इतिहास जतन करण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेले हे संग्रहालय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणार आहे.

या संग्रहालयाचा मुख्य उद्देश लेखांकन क्षेत्राचा ऐतिहासिक प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडणे, पारंपरिक लेखा साधने,दुर्मिळ दस्तऐवज आणि आधुनिक तांत्रिक साधनांचे प्रदर्शन करणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक जाण व करिअरविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन ICAI च्या वेस्टर्न रिजनचे चेअरमन सी.ए.केतन सैय्या यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार श्री.विकास शहा (लेंगरेकर) उपस्थित होते. यावेळी पुणे विभागाचे रिजनल कौन्सिल सदस्य सी.ए.राजेश अग्रवाल व सी.ए. अभिषेक धामणे, तसेच बारामती सी.ए.असोसिएशनचे सी.ए.प्रतीक दोशी, सी.ए.सम्राट सोमाणी, सी.ए. नवनाथ साळुंके आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक सरस्वती पूजनाने झाली. प्राचार्य प्रा.डॉ.अविनाश जगताप यांनी स्वागतपर भाषणात संग्रहालय हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे नमूद केले. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, हे संग्रहालय विद्यार्थ्यांमध्ये सीए व्यवसायाविषयी प्रेरणा निर्माण करेल.

संग्रहालयाची संकल्पना सी.ए.राजेश अग्रवाल यांनी मांडली, तर त्याची वैशिष्ट्ये सी.ए.अभिषेक धामणे व सी.ए. प्रतीक दोशी यांनी स्पष्ट केली.

यानंतर सी.ए.केतन सैय्या यांनी सीए अभ्यासक्रमाचे महत्त्व, त्यातील संधी व जागतिक स्तरावरील करिअर पर्यायांविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. बारामतीसारख्या शैक्षणिक केंद्रात असे संग्रहालय उभारले जाणे ही भविष्यातील सीए विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच टी. सी. कॉलेजला लवकरच सीए परीक्षाकेंद्र म्हणून मान्यता मिळेल, असा सकारात्मक संकेतही त्यांनी दिला.

या संग्रहालयाच्या उभारणीत वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. निरंजन शहा यांनी घेतलेल्या विशेष परिश्रमांचे मान्यवरांनी कौतुक केले.

 

 

अध्यक्षीय मनोगतात श्री.विकास शहा (लेंगरेकर) यांनी विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षणातील नव्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. संस्था विद्यार्थ्यांना नेहमीच नवनवीन ज्ञान देण्यासाठी व अद्ययावत सोयीसुविधा देण्यासाठी तत्पर असते.  या लेखा संग्रहालयामुळे त्यात भर पडली आहे. सीए चे केंद्र आपल्या महाविद्यालयात सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु असून सीएचे शिक्षण विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयात देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. हा उपक्रम संस्थेच्या दूरदृष्टीचा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या कटिबद्धतेचा प्रतीक असल्याचे सांगितले.

या उपक्रमास संस्थेचे पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.  या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष जवाहर शहा वाघोलीकर आणि सचिव मिलिंद शहा वाघोलीकर व संस्थेचे पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हा उपक्रम संस्थेच्या दूरदृष्टीचा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या कटिबद्धतेचा प्रतीक असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा.डॉ.सचिन गाडेकर, प्रा.डॉ.योगिनी मुळे, प्रा.डॉ.अरुण मगर, रजिस्ट्रार श्री. अभिनंदन शहा, विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, बारामतीतील सनदी लेखापाल तसेच वाणिज्य, बीबीए, बीबीए-सीए आणि सी.ए. (फाउंडेशन)चे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विवेक बळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ.निरंजन शहा यांनी केले. या उपक्रमामुळे टी. सी. महाविद्यालयाने व्यावसायिक शिक्षणाच्या क्षेत्रात एक नवा मानदंड निर्माण केला असून भविष्यातील चार्टर्ड अकाउंटंट्स घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

Back to top button