आपला जिल्हा

स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतरही रस्त्यासाठी संघर्ष;आजारी वृद्धाला झोळीतून चिखलातून नेले; वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू!

भोर तालुक्यातील खोपी गावातील कचरे वस्तीची विदारक परिस्थिती; प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांचा संताप

स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतरही रस्त्यासाठी संघर्ष;आजारी वृद्धाला झोळीतून चिखलातून नेले; वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू!

भोर तालुक्यातील खोपी गावातील कचरे वस्तीची विदारक परिस्थिती; प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांचा संताप

भोर ; प्रतिनिधि

भोर तालुक्यातील खोपी गावातील कचरे वस्ती आणि जानकर वस्तीला जाण्यासाठी अद्याप पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात या समस्येची तीव्रता आणखी वाढत असून, चिखल, दगड-गोटे आणि बांधांमधून तब्बल एक ते दीड किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. या परिस्थितीचा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे.

कचरे वस्तीतील बाळासाहेब कचरे (वय ६२) हे आजारी होते. मात्र वस्तीपर्यंत रस्ता नसल्याने रुग्णवाहिका किंवा इतर वाहन पोहोचणे शक्य झाले नाही. त्यामुळे गावकरी आणि नातेवाईकांनी त्यांना झोळीतून चिखल, दगड-गोटे आणि खडतर वाटेतून पायपीट करत उपचारासाठी दवाखान्यात नेले. मात्र वेळेवर वैद्यकीय उपचार मिळू न शकल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले.

या घटनेमुळे खोपी गावातील कचरे वस्तीतील नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्ता नसल्यामुळे एखादी व्यक्ती आजारी पडल्यानंतर तिला दवाखान्यात नेण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत असल्याची परिस्थिती आहे. पावसाळ्यात चिखलामुळे दुचाकी किंवा चारचाकी वाहन वस्तीपर्यंत नेणेही कठीण होते.

अनेक वर्षांपासून रस्त्याची मागणी

कचरे वस्ती तसेच जानकर वस्तीला जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र, स्थानिक प्रशासन, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

रस्ता नसल्यामुळे या भागातील नागरिकांना केवळ आरोग्य सुविधांपासूनच नव्हे, तर शासकीय सेवा, शिक्षण, दळणवळण आणि इतर मूलभूत सुविधांपासूनही वंचित राहावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

‘आणखी किती जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार?’

एका आजारी वृद्धाला झोळीतून चिखल तुडवत दवाखान्यात न्यावे लागणे आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू होणे, या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

“एका नागरिकाचा जीव गेल्यानंतरही प्रशासन जागे होणार नसेल, तर आणखी किती जीव गेल्यावर या रस्त्याचा प्रश्न सोडवला जाणार?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

तातडीने पाहणी करून रस्ता करण्याची मागणी

या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने घटनास्थळी पाहणी करावी, कचरे वस्ती व जानकर वस्तीला जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, तसेच नागरिकांना आरोग्य व दळणवळणाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Back to top button