स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी हातभार

स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी हातभार
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील विविध व्यापारी संघटनांच्या वतीने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजहित आणि मानवतावादी भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर गुरुवार दिनांक ५ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या स्व. माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक, बारामती येथे पार पडणार आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. एका रक्तदात्याच्या रक्तामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात.
अपघातग्रस्त रुग्ण, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, तसेच विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना रक्ताची अत्यंत गरज भासते. त्यामुळे या शिबिराच्या माध्यमातून जास्तीत जास्त रक्तसाठा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या रक्तदान शिबिराचे आयोजन महावीर पथ व्यापारी असोसिएशन, स्टेशन रोड व्यापारी असोसिएशन आणि सिनेमा रोड व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. व्यापारी वर्गाने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम हाती घेतला असून शहरातील व्यापारी, नागरिक, युवक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या रक्तदान कार्यात सहभाग नोंदवून रक्तदान करा आणि गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी हातभार लावा, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.






