हजारो अनाथ लेकरांची माय सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन
रुग्णालयाबाहेर गर्दी वाढताना दिसत आहे.
हजारो अनाथ लेकरांची माय सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन
रुग्णालयाबाहेर गर्दी वाढताना दिसत आहे.
पुणे,प्रतिनिधी
हजारो अनाथ लेकरांची माय सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं आहे. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई यांच्यावर पुण्याच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुर होते. त्यांचं हर्नियाचं ऑपरेशन झालं होतं. प्रकृती खालावल्याने त्यांना हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली. सिंधुताई यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने हजारो अनाथ बालकांची माय हरपली आहे. सिंधुताई यांच्या निधनाची माहिती समजल्यानंतर रुग्णालयाबाहेर गर्दी वाढताना दिसत आहे.
सिंधुताई यांना त्यांच्या समाजकार्यासाठी गेल्यावर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच महाराष्ट्र सरकारकडून त्यांना 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रधान करण्यात आला होता. त्याआधी 2010 साली त्यांना महाराष्ट्र सरकारचा अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. अशाप्रकारे सिंधुताई यांना जवळपास 750 आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
सिंधूताई यांचं समाजकार्याची जगभरात दखल घेतली गेलीय. त्यांनी आपल्या आयुष्यात खूप खडतर प्रवास केला. सर्व खडतर प्रसंगांना तोंड देत त्यांनी हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला. खरंतर सिंधुताई यांचा खडतर प्रवास हा त्यांच्या जन्मापासूनच सुरु झाला होता. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे झाला होता. घराला कुलदीपक हवा असताना मुलगी जन्माला आली म्हणून सिंधूताई यांचं नाव चिंधी ठेवण्यात आलं होतं. गावा लहान असल्याने सुविधांचा अभाव आणि इतर कारणांमुळे सिंधुताई यांचं फक्त इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण झालं होतं. तसेच वयाच्या 9 व्या वर्षी वयाने 26 वर्षांनी मोठे असलेले श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला होता. अनेक संघर्षांना सामोरं जात त्यांनी हजारो अनाथ बालकांचं पालकत्व स्विकारलं होतं.
सिंधुताई यांनी अनाथ बालकांसाठी 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. त्यांनी लहान मुलांच्या शिक्षणापासून ते उज्ज्वल भविष्याची जबाबदारी घेतली. त्यादिशेने त्यांनी अनेक वर्ष काम केलं. त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून हजारपेक्षा जास्त बालकांचं पालकत्व निभावलं. त्याचबरोबर त्यांनी अशा अनेक संस्थांमधून अनाथ बालकांची जबाबदारी खांद्यावर घेतली.