हृदयद्रावक ! इंदापूरमध्ये शेततळ्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू
मन हेलवणाऱ्या घटनेने पंचक्रोशीत हळहळ

हृदयद्रावक ! इंदापूरमध्ये शेततळ्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू
मन हेलवणाऱ्या घटनेने पंचक्रोशीत हळहळ
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर मध्ये मंगळवारी ( दि.२१ ) मन हेलावणारी घटना समोर आली आहे.इंदापूर शहरातील सरस्वतीनगर परिसरात राहणाऱ्या आर्यन मच्छिंद्र नाथजोगी या इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या दहा वर्षीय चिमुकल्याचा तालुका क्रीडा संकुला लगत असणाऱ्या शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मृत शरीर तलावातून बाहेर काढण्यात आले.
सोमवारी (दि.२०) सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास क्रीडा संकुलाच्या मैदानावर खेळून झाल्यानंतर आर्यन आणि त्याचे दोघे मित्र हात-पाय धुण्यासाठी शेततळ्यावर गेले होते. मात्र पाय घसरून आर्यन शेततळ्यात पडला. यावेळी घाबरून त्याचे दोघे मित्र तेथून पळून आले. या घटनेमुळे घाबरल्याने याची वाच्यता त्यांनी कुठेही केली नाही.
सोमवारी (दि.२०) सायंकाळी सरस्वतीनगर येथील गणेश मंदिरा जवळ खेळत असताना आर्यन बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी इंदापूर पोलीस ठाण्यात केली होती. त्यामुळे इंदापूर पोलीस, कुटुंबीय आणि शेजाऱ्यांकडून आर्यनचा सकाळपर्यंत कसून शोध सुरू होता. मात्र आज सकाळी त्याच्या मित्रांनी ही बाब उघड केल्याने सर्वांनी त्वरित शेततळ्याकडे धाव घेतली. शोधाअंती आर्यनचे मृत शरीर शेततळ्यात आढळून आले. ही मन हेलावणारी घटना समजताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. आर्यनचे वडील हे डाळिंब मार्केटमध्ये मजुरीचे तर आई सोनाई डेअरीवर कामाला जातात. ते मूळचे लातूर भागाकडचे आहेत.
क्रीडा संकुल, पाठीमागे असलेला तलाव आणि संरक्षक भिंत व तारेच्या कंपाऊंडची दुरावस्था
इंदापूर तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी, खेळण्यासाठी आणि व्यायामासाठी येणाऱ्यांची खूप गर्दी असते. त्याला लहान मुलेही अपवाद नाहीत. क्रीडा संकुलाच्या चोहो बाजूंनी संरक्षक भिंत आहे. मात्र शेत तलावाच्या बाजूने तलावाला चिटकूनच असलेले संरक्षक भिंत अतिशय लहान आणि त्यावर असलेली जाळी देखील पूर्णपणे तुटलेली आहे. तर तलावाच्या पूर्वेकडे असलेली संरक्षक जाळीही पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे या दोन्ही बाजूंनी लहान मुले सहज तलावाच्या ठिकाणी जाऊ शकतात. त्यामुळे क्रीडा संकुलाची तलावाच्या बाजूने असलेल्या संरक्षक भिंतींची उंची, त्यावरील संरक्षक जाळी अधिक वाढवण्याची व या तलावाच्या पूर्वेकडे असलेली संरक्षक जाळी देखील बदलण्याची गरज असून, या दोन्ही बाबी दुर्लक्षित नसत्या तर कदाचित ही दुर्दैवी घटना घडली नसती.