होमिओपॅथीचे प्रशासक डॉ.शहांच्या आमरण उपोषणाची राज्यसरकारने घेतली दखल…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 8 दिवसात कायम स्वरूपी सकारात्मक निर्णय घेणार..! इंदापूर, आदित्य बोराटे -

होमिओपॅथीचे प्रशासक
डॉ.शहांच्या आमरण उपोषणाची राज्यसरकारने घेतली दखल…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 8 दिवसात कायम स्वरूपी सकारात्मक निर्णय घेणार..!
इंदापूर, प्रतिनिधी
राज्यातील सीसीएमपी ( सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मोकोलॉजी ) उत्तीर्ण होमिओपॅथिक वैद्यकीय डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यक परिषदेतील नोंदणीचा प्रश्न येत्या 8 दिवसांत कायमस्वरूपी सोडवू अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ.बाहुबली शहा यांनी सुरू केलेले आमरण उपोषण आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते ऊसाचा रस घेऊन मागे घेतले. हा विषय कायम स्वरूपी न सुटल्यास पुन्हा बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा राज्यातील सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांच्या संघटनेने दिला आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनने खोटया व अर्धसत्य माहितीच्या आधारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित खात्याच्या मंत्र्याची दिशाभूल केल्याने सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेत नोंदणीसाठी चाप बसला. त्यामुळे संतप्त होमिओपॅथिक डॉक्टरांनी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक व मार्गदर्शक डॉ. बाहुबली शहा यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर (दि.16) जुलै रोजी सुरू केलेल्या आंदोलनास उस्फुर्त पाठिंबा दिला. आंदोलनात राज्यातून २० हजारहून जास्त डॉक्टर सहभागी झाले तर इतर डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवून आंदोलनास उस्फुर्त पाठिंबा दिल्याने ग्रामीण आरोग्य व्यवस्था ठप्प झाली.
यावेळी डॉ. बाहुबली शहा यांनी श्वासात श्वास असेपर्यंत होमिओपॅथिक डॉक्टरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगताच उपस्थित डॉक्टरांनी बाहुबली बाहुबली असा जयघोष केला.
यावेळी आमदार डॉ. संजय कुटे, डॉ. हिम्मत उढान, आ. सुरेश धस, आ. रवि राणा आ. नारायण कुचे, आ. देवेंद्र भोयर, आ. चैनसुख संचेती यांच्या सह 30 हून जास्त आमदारांनी आंदोलनस्थळी येत आंदोलनास जाहीर पाठिंबा दिल्याने जोरदार वातावरण निर्मिती झाली. राज्यातील सर्व भागातून हजारो डॉक्टर्स येत असल्याचे पाहून संध्याकाळी मंत्रालयातून चर्चेसाठी येण्याचा निरोप आल्यानंतर डॉ. बाहुबली शहा, डॉ. रजनीताई इंदुलकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मंत्रालयात दाखल झाले. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची सविस्तर चर्चा झाली. यावेळी डॉ. बाहुबली शहा यांनी सविस्तर कायदेशीर माहिती मुख्यमंत्री महोदय यांना दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी होमिओपॅथिक डॉक्टरांवर अन्याय होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मंत्रालयातील न्याय व विधी विभागाच्या सचिवांसह चर्चा करून हा प्रश्न सकारात्मक पद्धतीने सोडविला जाईल, हा अभ्यासक्रम बंद केला जाणार नाही तसेच होमिओपॅथिक डॉक्टर्स यांच्यावर अन्याय केला जाणार नाही अशी ग्वाही दिली तर सर्व प्रक्रियावर आपले वैयक्तिक लक्ष असेल असे सूचित करून डॉ. बाहुबली शहा यांनी उपोषण मागे घ्यावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याने डॉ. शहा यांनी उपोषण मागे घेतले. यानंतर उपस्थित डॉक्टरांनी एकच जल्लोष केला.
यावेळी डॉ. शहा म्हणाले, सीसीएमपी अभ्यासक्रम हा जनते च्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधिमंडळाने एकमताने कायद्यास मंजुरी दिली. त्यानंतर नाशिक आरोग्य विद्यापीठाने मंजूर कायद्यान्वये या अभ्यासक्रमाची निर्मिती केली. शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात याचे शिक्षण देण्यात आले, या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या सर्व डॉक्टरांच्या परीक्षा देखील आधुनिक चिकित्सा पद्धतीच्या डॉक्टरांनी घेतल्या. या अभ्यासक्रमाची पहिली तुकडी सन 2017 मध्ये बाहेर पडली असून आजपर्यंत दहा हजार हून जास्त डॉक्टरांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. वैध अभ्यासक्रम साडेपाच वर्षाचा असून तो एमबीबीएस सम तुल्य आहे. होमिओपॅथी अभ्यासक्रम अधिक 1 वर्षाचा क्लिनिकल रोटेशन, प्रात्यक्षिकासह आधुनिक चिकित्सा पद्धतीतील औषध शास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करणारे सीसीएमपी अर्हताधारक डॉक्टर आधुनिक चिकित्सा पद्धतीने रुग्णोपचार करण्यास सक्षम आहेत.
महाराष्ट्र वैद्यक परिषद कायदा 1965 मधील तरतूदीनुसार सीसीएमपी अर्हता अधिनियमाच्या अनुसूचित 28 व्या क्रमांकाने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अधिनियमातील तरतुदींना अनुसरून
सीसीएमपी अर्हता धारकांची स्वतंत्र नोंदवहीत नोंद करणे महाराष्ट्र वैद्यक परिषदेस अनिवार्य आहे. गेली आठ वर्षे त्यासाठी टाळाटाळ होत आहे. विधी व न्याय विभाग अभिप्रायासह वैद्यकीय शिक्षण विभागाने पत्र पाठवल्यानंतर एमएमसी कडून नोंदणी प्रक्रिया (दि.15) जुलै पासून सुरू करण्याची अधिसूचना देण्यात आली. या पूर्णपणे वैध प्रक्रियेस आयएमएने विरोध करून ही प्रकिया बंद पाडली तसेच मंत्रिमंडळ म्हणजेच विधिमंडळ म्हणजे कायदामंडळ असून देखील आयएमएने शासनावर अविश्वास व्यक्त केला.
संविधान व त्यानुसार केलेल्या कायद्याप्रती आयएमए अविश्वास व्यक्त करत असून त्यांच्या लोकशाही विरोधी भूमिकेला विरोध म्हणून तसेच सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांना न्याय देण्यासाठी आपण हे प्राणांतिक आंदोलन सुरू केले होते. मात्र शासनाने चार दिवसात कायमस्वरूपी होणाऱ्या निर्णयास कोणीही आव्हान देऊ नये असे सूतोवाच केले. शिष्टमंडळाने शासनाने आठ दिवस घ्यावे मात्र सीसीएमपी डॉक्टरांवर अन्याय होऊ देऊ नये अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. शहा यांनी केली. त्यामुळे येत्या आठ दिवसांत कायमस्वरूपी सकारात्मक निर्णय होईल अशी आशा
डॉ. बाहुबली शहा यांनी व्यक्त केली.
दरम्यान डॉ. अरुण भस्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपोषण सुरू झाल्यानंतर आझाद मैदानावर होमिओपॅथिक डॉक्टरांचा जनसागर उसळला. यावेळी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करणारे आमदार सदाभाऊ खोत व रोहित पवार, डॉ. दीपक जगताप, डॉ. बाळकृष्ण गायकवाड, डॉ. राजेंद्र पाटुकले, डॉ. संदेश शहा आदींनी भाषणातून होमिओपॅथिक डॉक्टरांना राजाश्रय मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले. विधिमंडळात आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील होमिओपॅथिक डॉक्टरांचा प्रश्न उपस्थित केल्यावर सर्वांनी जल्लोष केला. व्यासपीठ व्यवस्थापन डॉ. शिवदास भोसले, डॉ. नितीन गावडे, डॉ. अवचार, डॉ. मिनाक्षी सेठ, डॉ. सुनील मुळीक व सहकाऱ्यांनी केले.