बारामती पोलीस ऍक्टिव मोड मध्ये;२७ बुलेटसह २३४ वाहनांवर कडक कारवाई
दुचाकीचालकांना तब्बल १ लाख ८५ हजार २५० रुपयांचा आर्थिक दंड

बारामती पोलीस ऍक्टिव मोड मध्ये;२७ बुलेटसह २३४ वाहनांवर कडक कारवाई
दुचाकीचालकांना तब्बल १ लाख ८५ हजार २५० रुपयांचा आर्थिक दंड
बारामती वार्तापत्र
वाहतूक नियमांची पायमल्ली करून बेशिस्तपणे दुचाकी चालवणाऱ्या वाहनचालकांना बारामतीच्या वाहतुक शाखेने चांगलाच दणका दिला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचेकडून वाहतूक पोलिसांसोबत दोन दिवस करण्यात आलेल्या कारवाईत एकूण २३४ कारवाया करून या दुचाकीचालकांना तब्बल १ लाख ८५ हजार २५० रुपयांचा आर्थिक दंड करण्यात आला आहे.
दि. २७, २८, २९ डिसेंबर या कालावधीत वाहतूक शाखेकडून दुचाकी चालकांकडून ट्रिपल सीट दुचाकी चालवणे, वाहन परवाना जवळ न बाळगणे, दुचाक्यांना अवाढव्य आवाजाचे सायलेंसर बसवणे, दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणे अशा अनेक कारणांवरून कारवाया करण्यात आल्या. विशेष म्हणजे यात बुलेट गाड्यांवर अधिक लक्ष केंद्रित करून कारवाईची मोहीम राबवण्यात आली.
बारामती येथील कसबा चौक व न्यायालय कॉर्नर चौक, फलटण चौक व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथे ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ट्रीपल सीट २५, वाहन चालक परवाना जवळ न बाळगणे ५५, नंबर प्लेट संदर्भात ५६, विना परवाना वाहन चालविणे ०४, वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणे ०६, बुलेटचे मूळ सायलेंसर बदलणे २७ व इतर ५० अशा एकूण २३४ प्रकरणांमधून तब्बल १ लाख ८५ हजार २५० इतका दंड करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी याअगोदरही मोठ्या दंडात्मक कारवाया करून वाहतूक व्यवस्था व नियमांची अंमलबजावणी करण्यात आली होती.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनखली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक फौजदार अशोक झगडे, सुभाष काळे, पोलीस हवालदार प्रदीप काळे, महिला पोलीस हवालदार स्वाती काजळे, रुपाली जमदाडे, माया निगडे, रेश्मा काळे, सीमा घुले, पोलीस कॉन्स्टेबल अजिंक्य कदम व आर.सी.पी पथकाचे पोलीस अंमलदार आदींनी केली आहे.
बारामती शहरातील काही भागात बुलेट गाड्यांचे सायलेंसर काढून फटाका आवाज काढतात. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघण करून दुचाकीवरून स्टंटबाजी करणे, महिला-मुलींना त्रास देणे असे प्रकार करू नयेत. अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. येत्या कालावधीत शाळा कॉलेजेस मध्ये जनजागृती मोहीम सुद्धा सुरू करण्यात येणार आहे.
– चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, बारामती वाहतूक शाखा