क्राईम रिपोर्ट

108 अॅम्ब्युलन्स, रुग्णालये आणि आर्थिक देवाणघेवाण!;बारामतीत चर्चेला उधाण,रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याची चर्चा

काही खाजगी अॅम्ब्युलन्स चालकांना राजकीय पाठबळ

108 अॅम्ब्युलन्स, रुग्णालये आणि आर्थिक देवाणघेवाण!;बारामतीत चर्चेला उधाण,रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याची चर्चा

काही खाजगी अॅम्ब्युलन्स चालकांना राजकीय पाठबळ

बारामती वार्तापत्र

बारामती शहरात आपत्कालीन 108 अॅम्ब्युलन्स सेवेबाबत गंभीर स्वरूपाचे आरोप पुढे येत असून वैद्यकीय व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्र शासनाने 108 ही आपत्कालीन अॅम्ब्युलन्स सेवा मुख्यतः गरीब व गरजू रुग्णांना तातडीने मोफत वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने सुरू केली आहे. मात्र या सेवेचा गैरवापर होत असल्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे.

स्थानिक पातळीवर बोलले जात आहे की, 108 वर कॉल केल्यानंतर काही रुग्णांना शासकीय रुग्णालयात न नेता ठराविक खाजगी रुग्णालयांकडे वळवले जाते. संबंधित प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याचे सांगितले जात असून, त्यामध्ये रुग्णांना विशिष्ट खाजगी रुग्णालयात नेण्याबाबत सूचनांचे उल्लेख ? असल्याची चर्चा आहे. या प्रकरणामुळे बारामतीतील वैद्यकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याशिवाय, शासकीय रुग्णांसाठी उपलब्ध असलेली मोफत औषधे देखील विक्रीस काढली जात असल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.हा प्रकार अत्यंत गंभीर असून कारण तो थेट गरजू रुग्णांच्या हक्कांवर घाला घालणारा आहे.

दरम्यान, काही खाजगी अॅम्ब्युलन्स चालकांना राजकीय पाठबळ असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे अशा गैरप्रकारांवर कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. तसेच बारामतीसह इंदापूर आणि दौंड परिसरात काही अॅम्ब्युलन्स वाहने टॅक्स, इन्शुरन्स, परवाना (परमिट) आणि आवश्यक कागदपत्रांशिवाय चालवली जात असल्याचेही सांगितले जात आहे. ही वाहने अनेक वर्षांपासून विनापरवाना रस्त्यावर धावत असल्याचा आरोप असून, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

यासंदर्भात रोख व ऑनलाइन पैशांची देवाणघेवाण होत असल्याचा कथित व्हिडिओ देखील समोर आल्याचे बोलले जात आहे. मात्र या सर्व आरोपांची अधिकृत चौकशी होणे अत्यावश्यक आहे. प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान,संबंधित यंत्रणा किंवा प्रशासनाकडून अधिकृत भूमिका जाहीर झालेली नसून,या आरोपांवर काय स्पष्टीकरण देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button