उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रुपाली ठोंबरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रवेश करण्यापूर्वी रुपाली ठोंबरे यांनी ट्वीट करुन प्रवेशाचे संकेत दिले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रुपाली ठोंबरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रवेश करण्यापूर्वी रुपाली ठोंबरे यांनी ट्वीट करुन प्रवेशाचे संकेत दिले होते.
मुंबई -प्रतिनिधी
मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर पुण्याच्या डॅशिंग लेडी म्हणून नावलौकिक कमावलेल्या रुपाली ठोंबरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रुपाली ठोंबरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाल्या.
पुण्यामध्ये पक्षाला मोठी ताकद भेटेल – अजित पवार
“रुपाली ताईंना माननारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे लोक त्यांना मानतात. त्यांच्यामुळे पुणे शहर पुढे जाईल, महिलांचा विकास होईल,” असे अजित पवार यावेळी म्हणाले. रुपाली ठोंबरे यांच्यासोबत मनसेच्या लावंण्या शिंदे, वंदना साळवी, मनिषा सरोदे, मनिषा कावेडिया, प्राजक्ता पाटील, प्रिया सूर्यवंशी, अभयसिंह मांढरे, अजय दराडे यांनी मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
पालकमंत्र्यांना भेटणे मनसेच्या नेत्यांना खटकत होतं –
रुपाली म्हणाल्या की, ज्या पद्धतीने त्या आधी लोकांसाठी काम करत होत्या, त्याच पद्धतीने राष्ट्रवादीत आल्यानंतरही लोकांसाठी काम करणार आहेत. अजित पवारांनी दिलेल्या हिमतीमुळे मला राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची प्रेरणा मिळाली, असंही त्यांनी सांगितले. पालकमंत्री म्हणून अजित पवार खूप चांगले काम करत आहेत. मी ज्या कामांसाठी आतापर्यंत अजित पवारांची भेट घेतली, ती सर्व कामे त्यांनी कायदेशीररित्या पूर्ण केली. ”पालकमंत्री अजित पवारांची भेट घेतल्यानंतर सतत त्यावर पक्षात आक्षेप घेतला जात होता. पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी कधीही पक्षीय भेदभाव केला नाही. मात्र माझ्याच पक्षातील अनेकांना ते खटकत होते, असे रुपाली ठोंबरे यांनी यावेळी सांगितले.
प्रवेश करण्यापूर्वी रुपाली ठोंबरे यांनी ट्वीट करुन प्रवेशाचे संकेत दिले होते. “आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‘हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत; हो म्हणूनच ठरलंय! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार…”, असे ट्वीट रुपाली ठोंबरे यांनी केलं होते.
कोण आहेत रुपाली ठोंबरे?
रुपाली ठोंबरे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. तसेच मनसेच्या महिला विभागाच्या पुणे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली होती. अलीकडेच त्यांची शहराध्यक्ष पदावरुन उचलबांगडी करत राज्य उपाध्यक्ष पद दिले होते. मंगळवारी त्यांनी आपला राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर केला होता.