इंदापूर

छत्रपती संभाजी महाराजांच्या समर्थनार्थ इंदापूरात सकल मराठा समाज एकवटला !

लाक्षणिक उपोषणात मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी

छत्रपती संभाजी महाराजांच्या समर्थनार्थ इंदापूरात सकल मराठा समाज एकवटला !

लाक्षणिक उपोषणात मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी

इंदापूर : प्रतिनिधी

मुंबईच्या आझाद मैदानात खासदार संभाजी राजे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सोमवारी (दि.२८) इंदापूर तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं.या लाक्षणिक उपोषणात मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले आहेत.

मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा व इतर काही मागण्या घेऊन छत्रपती संभाजी राजे मुंबईत आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्यभरातून मराठा समाज हा छत्रपती संभाजीराजे यांना आपला पाठिंबा दर्शवत असताना इंदापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी इंदापूर तहसील कार्यालयासमोर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. याप्रसंगी अनेक मराठा समाज बांधवानी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या.दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पीपल्स रिपब्लिकन पक्ष आदी राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह विविध संघटनानी सदरील आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे.

काय आहेत सकल मराठा समाजाच्या मागण्या……

१) मराठा समाजाला आरक्षण मिळावे.
२)कोपर्डीतील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी
३)मराठा आरक्षण मिळण्यासाठी न्या. भोसले समितीने केलेल्या शिफारशींची देखील अंमलबजाणी करण्यास तत्काळ सुरूवात करून, लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लागणारी प्रक्रिया सुरू करावी.
४)ईसीबीसी व एसईबीसी आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या, पण अद्याप नियुक्ती न झालेल्या उमेदवारांना त्यांची ज्या पदावर निवड झालेली आहे, त्याच पदावर कायमस्वरुपी नियुक्ती द्यावी.
५)सारथी संस्थेच्या सबलीकरणासाठी रोड मॅप तयार करुन सारथी संस्थेचे सक्षमीकरण करावे आणि येणाऱ्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात यासाठी भरीव निधीची तरतूद करावी.
६)अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे दिला जाणारा दहा लाख रूपये कर्ज व्याज परतावा हा २५ लाख रुपये करण्यात यावा. महामंडळ व्यवस्थित चालण्यासाठी, प्रशासकिय निर्णय घेण्यासाठी तसेच नविन योजना निर्माण करण्यासाठी महामंडळास संचालक मंडळ असणे गरजेचे आहे.
७)मराठा समाजातील युवकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे

सदरच्या आंदोलनस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता इंदापूर पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला असून इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.वाय मुजावर यांसह इतर अधिकारी व पोलीस कर्मचारी या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेत आहेत.

Related Articles

Back to top button