बारामतीमध्ये हा हाय व्होल्टेज ड्रामा! युगेंद्रांना घेऊन भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
चार महिन्यांनी पद मिळाले असते. पद मिळाले नाही म्हणून घर मोडायचे असतं का?
बारामतीमध्ये हा हाय व्होल्टेज ड्रामा! युगेंद्रांना घेऊन भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
चार महिन्यांनी पद मिळाले असते. पद मिळाले नाही म्हणून घर मोडायचे असतं का?
बारामती वार्तापत्र
यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील सर्वात चर्चेत आणि उत्कंठा वाढवणारी निवडणूक म्हणजे बारामतीची निवडणूक होय. कारण, लोकसभा निवडणुकीत ननंद विरुद्ध भावजय असा सामना झाल्यानंतर आता विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या लढत होत आहे.
बारामतीमध्ये हा हाय व्होल्टेज ड्रामा होत असतानाच शरद पवार आणि युगेंद्र पवार भाजप नेत्याच्या भेटीला गेले आहेत. शरद पवारांनी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
चंद्रराव तावरे हे शरद पवारांचे वर्गमित्र आहेत. भाजपचे नेते असलेले चंद्रराव तावरे हे माळेगाव कारखान्याचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक आहेत. चंद्रराव तावरे यांनी अजित पवारांविरोधात उमेदवारीही दाखल केली होती. बारामतीच्या लढतीकडे लक्ष लागलेलं असतानाच शरद पवारांनी युगेंद्र पवारांसोबत घेतलेली ही भेट चर्चेत आली आहे.
आमच्या काही लोकांनी उद्योग केला – शरद पवार
युगेंद्र पवार यांचा अर्ज भरल्यानंतर बोलताना शरद पवार म्हणाले, मी मार्गदर्शन करायची जबाबदारी घेतली आणि नवी पिढ्याच्या हातात अधिकार दिला. सत्ता नाही, म्हणून सहकारी आहेत त्यांची साथ सोडली. आमच्या काही लोकांनी उद्योग केला आणि पहाटे शपथ घेतली. राज्यपाल यांना उठवले, कशासाठी?, असा मिश्किल टोलाही शरद पवारांनी अजित पवारांना लगावला. अनेक पद दिली, अनेकांना मंत्री केलं. सुप्रियाला एक पद दिले का? तिनेही कधी मागितले नाही. घर एक ठेवण्याचे काम केलं. चार महिन्यांनी पद मिळाले असते. पद मिळाले नाही म्हणून घर मोडायचे असतं का?, घर मोडणे माझा स्वभाव नाही. कुटुंब एक राहिले पाहिजे ही माझी भूमिका, असंही शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.
कोण आहेत चंद्रराव तावरे?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय जीवनात सुरवातीपासूनच चंद्रराव तावरे यांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली होती. त्यानंतर सहकार क्षेत्रात त्यांनी अग्रेसर भूमिका घेऊन माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न केला होता. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात कायम भूमिका ठेवून सहकार वाचविण्यासाठी भाजपात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मागील 25 वर्षांपासून पवार कुटुंबीयांसोबत काडीमोड घेऊन सहकार वाचविण्यासाठी, तसंच प्रदूषित होत असलेली निरा नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी तावरे यांनी पुढाकार घेतला आहे.