बारामतीतील जळोची भाजी मार्केटमध्ये लसणाला उच्चांकी बाजारभाव
थंडीचा कडाका वाढल्याने बाजारात आवक कमी

बारामतीतील जळोची भाजी मार्केटमध्ये लसणाला उच्चांकी बाजारभाव
थंडीचा कडाका वाढल्याने बाजारात आवक कमी
बारामती वार्तापत्र
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे जळोची भाजी मार्केटमध्ये लसणाला उच्चांकी २८० रूपये प्रति किलोस असा भाव मिळाला तर सरासरी २२० रूपये प्रति किलो भाव मिळत आहे.
त्याचबरोबर शेवग्याचे भाव ही तेजीत असून शेवग्याला प्रति किलो कमाल २५० रूपये व सरासरी २०० रूपये असा उच्चांकी दर मिळत आहे.
गवार, वांगी, मिरची, भेंडी, वाटाणा, दोडका, गाजर, दुधी भोपळा, कारले व इतर फळभाज्या आणि पालेभाज्यांना चांगले दर मिळत आहेत. थंडीचा कडाका वाढल्याने बाजारात आवक कमी होत असल्यामुळे भाजीपाल्याचे बाजारभाव वाढले असल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
बारामती बाजार समितीने जळोची भाजी मार्केट आवारात शेतकरी व व्यापा-यांना विविध सुविधां बरोबरच सेलहॉलची उभारणी केलेली आहे. त्यामुळे शेतामालाचे ऊन, वारा, पावसापासून संरक्षण होत आहे. शेतमालाला कटती नाही, कुठलीही सुट नाही. त्यामुळे बारामतीसह आसपासच्या तालुक्यातून फळे व भाजीपाल्याची आवक होत आहे.
आवारात फळे व भाजीपाला उघड लिलावाने खरेदी विक्रीची सोय असल्याने बाहेरील खरेदीदार येत आहेत. त्यामुळे शेतक-यांनी आपला शेतमाल बाजार आवारातच विक्री करावा, असे आवाहन बारामती बाजार समितीतर्फे करण्यात येत आहे.