राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!;शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त पवार कुटुंबाचं “गेट-टुगेदर”
शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!;शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त पवार कुटुंबाचं “गेट-टुगेदर”
शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस
बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाच्या राजकारणातले मोठे नेते शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र पक्षातील आणि विरोधी पक्षातील अनेक नेते त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.
त्यातच राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवसानिमित्त शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार हे पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्या समवेत पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः अजित पवार यांचं स्वागत देखील केलं.
यावेळी सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे, ही रेवती सुळे हे देखील उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पवार कुटुंबाचं आजचं हे गेट-टुगेदर भविष्यात इतर पक्षांना जड जाईल का अशा चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. मात्र ही भेट केवळ कौटुंबिक होती, असं पवार कुटुंबीयांनी सांगितलं आहे.
अजितदादांच्या काकांना शुभेच्छा
आज महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते अर्थात शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे या दोघांचाही वाढदिवस आहे. त्यामुळेच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केल्या. काका शरद पवार यांना शुभेच्छा देताना अजित पवार म्हणाले, “आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.” अशी पोस्ट अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडियावर केली आहे. त्याचबरोबर ते स्वतः आज सहकुटुंब काकांच्या भेटीला देखील गेले आहेत.