26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने
राष्ट्राभिमान जागृत करणार्या कृती करून खर्या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा करूया !
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने
राष्ट्राभिमान जागृत करणार्या कृती करून खर्या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा करूया !
बारामती वार्तापत्र
प्रस्तावना – आज आपल्या देशाला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. आज पर्यंत शेजारी राष्ट्रांपासून निर्माण होणारा धोका,भ्रष्टाचार,आतंकवाद आणि मागील दोन वर्षांपासून निर्माण झालेली कोरोना महामारीची समस्या याला सर्व भारतीयांना तोंड द्यावे लागत आहे. देशात भ्रष्टाचाराने तर परिसीमा गाठली आहे. देशाच्या सीमाही सुरक्षित नाहीत. भविष्यात जर देशाची अशीच स्थिती राहिली, तर आपणा सर्वांचे अस्तित्व धोक्यात येईल. यासाठी आपण या देशाचे भावी नागरिक या नात्याने या सर्वांचा गांभीर्याने विचार करून त्यावर उपाययोजना काढायला हव्यात, तरच उद्याचा भारत आदर्श आणि सुजलाम्-सुफलाम् होईल. प्रजासत्ताक दिन साजरा करताना या सर्वच समस्यांचे आपण चिंतन करायला हवे. याचे प्रमुख कारण म्हणजे बहुतेकांमध्ये असलेला राष्ट्राभिमानाचा अभाव ! राष्ट्राभिमान आणि राष्ट्रप्रेम जागृत करणार्या कृती केल्यानेच खऱ्या अर्थाने आदर्श प्रजासत्ताक म्हणून साजरा केल्याचा आनंद मिळेल आणि हा देश स्वतंत्र करण्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या असंख्य क्रांतीकारकांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न होईल. स्वतंत्र भारतातील प्रत्येक नागरिकाने आज नाही तर आतापासूनच असा निर्धार करायला हवा की, मी प्रत्येक कृती ‘माझ्यात आणि इतरांमध्ये राष्ट्राभिमान जागृत होईल’,अशीच करीन. आज आपल्याला राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने आपल्यातील राष्ट्रभक्ती वाढवण्यासाठी मिळालेल्या या सुवर्ण संधीचा लाभ करून घेऊयात हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी करावयाच्या आवश्यक कृती – संपूर्ण देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला तिरंगा राष्ट्रध्वज हा राष्ट्रीय सण आणि अन्य काही दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. परंतु त्यानंतर रस्त्यात इतस्ततः कागदी अथवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज पडलेले हेही आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो, काही गटारात जातात,तर काही पायदळी तुडवले जातात.यामुळे राष्ट्रीय प्रतीकांची मानहानीच होते. राष्ट्रध्वज उंचावरच फडकविला पाहिजे. राष्ट्रीय सणाच्या या दिवशी राष्ट्रध्वज फडकवून त्याला वंदन करून राष्ट्रगीत म्हणतो, तेव्हा आपण या स्वतंत्र राष्ट्राचे नागरिक असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो आणि दुसर्या दिवशी मात्र असे कागदी राष्ट्रध्वज रस्त्यावर पडलेले पाहून आपल्याला काहीच कसे वाटत नाही ? अशी कृती होऊ नये म्हणून कागदी, प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नयेत. दुचाकी, चारचाकी, कपड्यांवर, चेहऱ्यावर असे राष्ट्रध्वज लावू नयेत, सध्यातर काही जण राष्ट्रध्वज तोंडावर रंगवून घेतात, काही जण राष्ट्रध्वजाची रगंसंगती असलेले कपडे घालतात, तर काही जण राष्ट्रध्वजाच्या रंगाचा केक कापतात, असे करणे म्हणजे राष्ट्रीय प्रतीकांचा अनादरच आहे. राष्ट्रीय सण साजरा करताना अश्या अयोग्य कृती होत असल्याचे आढळल्यास त्याला प्रतिबंध करण्यासाठी योग्य पाऊल उचलणे म्हणजेच राष्ट्राभिमान जोपासणे होय. अश्या अयोग्य कृती होऊ नयेत म्हणून प्रबोधन करणे हे आपण सर्वांचे राष्ट्रीय कर्तव्यच आहे.
काही संकेतस्थळांवर किंवा अन्य राष्ट्रांत आपल्या देशाचा नकाशा चुकीचा काढलेला आढळतो. त्यामध्ये काश्मीर, अरुणाचल प्रदेश हे भारतातील भाग दुसर्या देशांत दाखवले जातात. त्यामुळे ते भाग आपल्या राष्ट्रात नाहीत, असा त्याचा अर्थ होताे, हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने आपण सर्वांनी सतर्क रहायला हवे. असे आढळून आल्यास तात्काळ संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यायला हवे. यातूनच आपले राष्ट्राविषयीचे प्रेमही वृद्धींगत होईल.
राष्ट्रभक्ती वृद्धींगत करण्यासाठी आवश्यक कृती – राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता आहे, याचे स्मरण केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या दिवशीच बहुतांश भारतियांना होते. आता केवळ २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट यांदिवशी राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी झेंडावंदन करणे,भाषणे करणे आणि देशभक्तीपर गीते लावणे अश्या कृती होत असतात परंतु एवढ्यावरच न थांबता प्रतिदिनी राष्ट्राच्या विकासासाठी हातभार लावणे, योग्य कृती होते ना ? याचे चिंतन करणे आवश्यक आहे. प्रजासत्ताकदिन म्हणजे राष्ट्रीय कर्तव्यांची जाणीव करुन देणारा राष्ट्रीय सण ! राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, वन्दे मातरम् सारखे राष्ट्रीय गीत, राष्ट्राचा नकाशा (म्हणजेच मानबिंदू) ही आपली राष्ट्रीय प्रतिके आहेत. यांचा यथायोग्य सन्मान राखणे, हे आपले राष्ट्रकर्तव्य आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, आपल्या राष्ट्राचा नकाशा यांचा अवमान झालेला आपल्याला पहायला मिळतो. आपल्या राष्ट्रप्रतिकांचा मान राखणे आणि त्यांचा कुठेही अवमान होत असेल, तर तो थांबवणे ही सुद्धा आपली राष्ट्रभक्तीच होय.
ध्वज संहितेबाबत जागृती निर्माण व्हायला हवी – राष्ट्रचिन्हे,प्रतीके यांचा वापर कसा करावा या विषयी असणाऱ्या ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हायला हवी. राष्ट्रध्वजाचा वापर करताना या संहितेनुसार होणे क्रमप्राप्त आहे. असे करताना जर चूक झाली तर तो दंडनीय अपराध आहे. याची जागृती होणे पण तितकेच महत्वाचे आहे. शासनपातळीवर याकरिता सर्वतोपरी सहकार्य मिळत असते हे पण लक्षात घेऊन योग्य कृती करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.
खालील कृती केल्यातर राष्ट्राभिमान जागृत होण्यास नक्कीच साहाय्य होईल. –
१. झेंड्याचा अवमान रोखणे
२. क्रांतीकारकांच्या चरित्रांचा अभ्यास करून त्यांची मूल्ये कृतीत आणणे
३. राष्ट्रभक्तीपर गीतांचे पाठांतर करणे आणि ती समूहाने गाणे
४. शाळेत संपूर्ण ‘वंदे मातरम्’ म्हणण्यास प्रवृत्त करणे
५. राष्ट्रगीताचा अवमान होत असल्यास तो रोखणे
६. क्रांतीकारकांच्या जीवनावर आधारित चर्चासत्रे घेणे
७. प्रतिज्ञेप्रमाणे आचरण करणे
८. क्रांतीकारक आणि राष्ट्रभक्त यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करणे
९. स्वातंत्र्य दिनी अथवा प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना थांबविणे.
प्रत्येक भारतीय नागरिकांनी राष्ट्राभिमान जोपासून वरील कृती आचरणात आणणे आणि इतरांना कृती प्रवण करणे हाच खरा प्रजासत्ताक होय. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने असा संकल्प करूया. जय हिंद ! जय भारत !
संकलक – श्री. राजन बुणगे ,
सौजन्य – हिंदु जनजागृती समिती