बारामतीतील तिघांना फुकटची बिर्याणी पडली महागात! थेट सहा वर्ष शिक्षा अन् लाखांचा दंड
एक लाखांचा दंडही आता भरावा लागणार

बारामतीतील तिघांना फुकटची बिर्याणी पडली महागात! थेट सहा वर्ष शिक्षा अन् लाखांचा दंड
एक लाखांचा दंडही आता भरावा लागणार
बारामती वार्तापत्र
फुकटची बिर्याणी मागणं बारामतीतील तिघांना चांगलंच महागात पडलंय. कारण या तिघांवर हॉटेल मालकाने थेट गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणात आरोपींना तब्बल सहा वर्षांचा तुरुंगवास भोगाव लागला.
तसेच एक लाख रुपये दंडही ठोठावला. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे पाहूया…
हे प्रकरण आहे 2018 मधलं… बारामतीतील जामा मस्जिद समोर राहणाऱ्या सद्दाम हारून कुरेशी यांची खाटीक गल्लीत मटन खानावळ आहे. कुरेशी हे 19 डिसेंबर 2018 ला रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास दुकानात जात असताना अचानक पाठीमागून दोन मोटार सायकल आल्या. त्यावर
पाच इसम आले होते. त्यातील किशोर ढोरे, अभिजित ढावरे व राहुल ढावरे हे आरोपी कुरेशी यांच्याजवळ आले. ‘तुला लय मस्ती आली काय ? आम्हाला फुकट बिर्याणी देत नाही काय ? असे म्हणून कुरेशी यांच्या मानेला आरोपींनी कोयता लावला. त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी कुरेशी यांना त्यांच्या खानावळीत नेलं. तिथे गल्ल्यातील रक्कम घेऊन आरोपी पसार झाले. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात कुरेशी यांनी फिर्याद दिली. त्यावरून या तिघांवरही गुन्हा दाखल झाला. लगेचच पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. तिन्ही आरोपींवर मोक्का कायदा कलम 3(1)(ii),3(4) प्रमाणे कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी तिन्ही आरोपी गेले सहा वर्ष येरवडा तुरुंगात होते. दरम्यान या आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने एक लाखांचा दंड ठोठावला आहे. थंड न भरल्यास आरोपींना आणखी तीन महिने कारावास होऊ शकतो.
केवळ फुकट बिर्याणी खायला दिली नाही म्हणून या आरोपींनी कुरेशी यांना मारहाण केली होती. त्याच गोष्टीची शिक्षा तब्बल सहा वर्ष भोगावी लागली. त्याबरोबरच एक लाखांचा दंडही आता भरावा लागणार आहे. त्यामुळे या अनोख्या प्रकरणाची चर्चा संपूर्ण पुणे जिल्ह्यात होताना दिसत आहे.