बारामतीतील महात्मा फुले चौकात डंपर आणि दुचाकी अपघात;एकाच कुटुंबातील वडिलांसह दोन चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू
अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही

बारामतीतील महात्मा फुले चौकात डंपर आणि दुचाकी अपघात;एकाच कुटुंबातील वडिलांसह दोन चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू
अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही
बारामती वार्तापत्र
बारामतीतील महात्मा फुले चौकात डंपर आणि दुचाकीच्या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात वडील आणि दोन बहिणीचा मृत्यू झाला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. आज(27 जुलै) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी डंपरच्या चाकाखाली दुचाकी सापडल्याने तिघेही अक्षरक्ष: चेंगरल्या गेलेत. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेत चार वर्षाची मधुरा ओंकार आचार्य आणि दहा वर्षाच्या सई ओंकार आचार्य या दोन्ही मुलींचाही मृत्यू झाला.ओंकार आचार्य असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालकाचे नाव असून, तो मूळचा इंदापूर तालुक्यातील सणसर येथील रहिवासी आहे. सध्या ते बारामतीतील मोरगाव रोड येथे वास्तव्यास होते. या घटनेने संपूर्ण बारामती हळहळली आहे. सध्या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.
या अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, याप्रकरणी पोलीस तपास करत आहे. डंपर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बारामती शहरातील खंडोबानगर येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास अपघात झाल्यानंतर तेथे मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामती सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात पाठवले आहेत.
दरम्यान, अवजड वाहनांच्या अपघातांचे प्रमाण वाढलं असून यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाने अशा अवजड आणि भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांवर अंकुश ठेवून कडक कारवाई करण्याची आवश्यकता असल्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.