पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार घेणार शपथ?
शक्यता उद्या सायंकाळी शपथविधी होण्याचा अंदाज

पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार घेणार शपथ?
शक्यता उद्या सायंकाळी शपथविधी होण्याचा अंदाज
बारामती वार्तापत्र
राज्याला लवकरच पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर त्यांची अकाली एक्झिट झाली. दादांच्या निधनाने राष्ट्रवादीमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
इतकेच नव्हे तर महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह अर्थ, उत्पादन शुल्क आणि क्रीडा खात्याचा कारभार होता. त्यामुळे आता या खात्यांचा कारभार कोणाकडे द्यायचा आणि पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व कोणाकडे द्यायचं याची चर्चा राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुरू आहे. याचदरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
देवेंद्र फडणवीसांसोबत आज प्राथमिक चर्चा झाली आहे. देवेंद्र फडणवीसांना आम्ही येवढचं सांगितले की लवकरात लवकर निर्णय करायचा आहे. पक्षातील आमदारांशी बोलून आम्ही निर्णय घेणार आहोत. आज इतकेच आम्ही फक्त देवेंद्र फडणवीसांना सांगितलं. सुनेत्रा पवार यांच्या नावाची आज चर्चा केली नाही. कोणाला उपमुख्यमंत्रिपदावर बसवायचं हे आमदारांशी बोलून निर्णय घेणार आहोत. सगळ्यांच्या भावना समजून आम्ही निर्णय घेऊ, अशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार?, प्रफुल पटेल काय म्हणाले?
सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा केली नाही, ती आम्ही अंतर्गत चर्चा केली आहे. आम्ही जनभावनेचा, आमदारांचा, आमची स्वत:ची भावना आहे की, योग्य निर्णय केला पाहिजे. अजूनही राजकीय शोक आहे. घरचे कार्यक्रम चालू आहेत. आम्ही सुनेत्रा पवार यांच्याशी बोलणार आहोत, किमान घरचे कार्यक्रम आटपवून रात्री किंवा उद्या चर्चा करू, असं प्रफुल पटेल यांनी सांगितले. लवकरात लवकर आम्ही ही जागा भरु, लवकरच योग्य निर्णय होईल, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
पवार कुटुंबीय एकत्र बसून निर्णय घेणार
अजित पवारांच्या पश्चात आता दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आलाय. पक्ष एकत्रीकरणाचा निर्णय पवार कुटुंब एकत्र बसून लवकरच घेईल अशी माहिती समोर येतेय. मात्र अंतिम निर्णय शरद पवारच घेतील असं समजतंय. पक्ष एकत्रित करण्याच्या आधीच्या चर्चांमध्ये पवार काका पुतण्यासह सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे सहभागी झाले होते. मात्र आता अजित पवार नसल्याने पवार कुटुंबीय एकत्र बसून हा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आज अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी 12 वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. त्यानंतर आज अजित पवारांच्या अस्थी गोळा करण्यात आल्या. काल अजित पवारांवर अंत्यसंस्कार झाल्यावर आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये त्यांच्या अस्थी गोळा करण्यात आल्या. यावेळी शरद पवारही उपस्थित होते. शरद पवारांनी अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन घेतलं. यावेळी पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार, राजेंद्र पवार, रणजित पवार, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवारसह अनेक नातवाईक आणि कार्यकर्तेही उपस्थित होते.






