संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना तात्पुरता दिलासा, सुनावणी पूर्ण होईपर्यंत अटक टळली
राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रं सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे दोन दिवसांचा अवधी मागून घेतला आहे.

संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना तात्पुरता दिलासा, सुनावणी पूर्ण होईपर्यंत अटक टळली
राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रं सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे दोन दिवसांचा अवधी मागून घेतला आहे.
मुंबई : प्रतिनिधी
संतोष परब हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन नाकारला होता. आता आमदार नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज मंगळवार (दि 04) रोजी नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर तातडीने सुनावणी झाली आहे. यामध्ये आमदार राणेंना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. राणेंच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना अटक न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी ७ जानेवारी रोजी होणार आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात शिवसेना आक्रमक झाली आहे. या प्रकरणी नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तेव्हापासून नितेश राणे समोर आलेले नाहीत.
आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court )अर्ज दाखल केला आहे. कोर्टात यावर सुनावणी सुरु आहे. संतोष परब यांच्यावरील हल्ल्यात नितेश राणे यांचं नाव समोर आले आहे. त्यानंतर राणेंच्या वकिलांकडून जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, कोर्टाने हा अर्ज नामंजूर केला. त्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनावर अर्जावर सुनावणी सुरु आहे.
सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध शिवसेना –
कोकणामध्ये राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा हा संघर्ष सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला आहे. तर राणे विरुद्ध शिवसेना असा सामना या निवडणुकीमध्ये रंगला होता. मात्र या निवडणुकीत अखेर राणे यांना मोठे यश मिळाले. यामध्ये राणे गटाच्या 11 जागा निवडून आल्या आहेत. तसेच शिवसेनेचे हातात असलेली सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक आता नारायण राणे यांच्या गटाकडे आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोकणामध्ये पुन्हा नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे.