बेशिस्त पार्किंग,46 जणांवर कारवाई: इंदापूर पोलिसांनी 37 हजार 500 रुपयांचा दंड केला वसूल
नियमित कारवाईची गरज...

बेशिस्त पार्किंग,46 जणांवर कारवाई: इंदापूर पोलिसांनी 37 हजार 500 रुपयांचा दंड केला वसूल
नियमित कारवाईची गरज…
इंदापूर, आदित्य बोराटे –
इंदापूर शहरातील नो पार्किंग मधील वाहने, रस्त्यावर वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 46 जणांवर पोलिसांनी कारवाई करत 37 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शहरात बाबा चौक, बस स्थानक परिसर, कॉलेज समोरील रस्त्यावर समोर नेहमीच अवैध पार्किंगने रस्ता गिळंकृत केलेला असतो, त्याच प्रमाणे नगरपरिषद,पंचायत समिती, बस स्थानकातील परिसरात नागरिक रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने लावून वाहतुकीची कोंडी करत होते. त्यामुळे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी वाहतूक पोलिस सुहास आरणे, खाडे, शिंदे,नागरगोजे, यांना कारवाईचे आदेश दिले. वाहतूक पोलिसांनी गुरुवारी अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने, बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवर, विना नंबर प्लेट वाहने यांच्यावर कारवाया केल्या. तसेच शहरातील बाबा चौक ते पंचायत समिती बाहेरील परिसर, बस स्थानक आणि कॉलेजपर्यंत बेशिस्त वाहन रस्ता अडवणाऱ्या वाहनांना दंड आकारून कारवाई केली. एकूण 46 कारवायामध्ये 37 हजार 500 रुपयांचा दंड करण्यात आला.
नियमित कारवाईची गरज जुना पुणे सोलापूर रस्त्यावर बाबा चौक पासून थेट कॉलेजपर्यंत ठीक ठिकाणी अवैध पार्किंगने रस्ता अक्षरशः गिळला आहे. मात्र पालिका आणि वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष होत होते. वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलिसांनी नियमित कारवाईचा धडाका सुरूच ठेवावा,अशी मागणी होत आहे.