60 वर्षावरील नागरिकांना आजपासून बुस्टर डोस
दुसरा डोस घेऊन 9 महिने उलटले आहेत किंवा 39 आठवडे झालेत, त्यांनाच हा बुस्टर डोस मिळेल.
60 वर्षावरील नागरिकांना आजपासून बुस्टर डोस
दुसरा डोस घेऊन 9 महिने उलटले आहेत किंवा 39 आठवडे झालेत, त्यांनाच हा बुस्टर डोस मिळेल.
बारामती वार्तापत्र
आजपासून म्हणजे सोमवारपासून बारामतीसह महाराष्ट्रात बुस्टर डोस दिला जाणार आहे. याचा फायदा फ्रंटलाईन वर्कर्स, व्याधी असलेले साठ वर्षाच्या पुढचे नागरिक तसत आरोग्य कर्मचाऱ्यांना होणार आहे. नेमका किती लोकांना याचा फायदा होईल याचा सध्या तरी आकडा उपलब्ध नाही. पण ओमिक्रॉनचं वाढतं सकंट पहाता बुस्टर डोसची मात्रा जालिम उपाय ठरेल अशी जाणकारांना आशा आहे. त्यामुळेच बुस्टर डोसची सुरुवात ही चांगली बाब मानली जातेय. एवढच नाही तर एकदा फ्रंटलाईन वर्कर्स तसेच ज्येष्ठांना बुस्टर डोस दिला तर सामान्यांनाही बुस्टर डोस देण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
नेमका कुणाला मिळणार बुस्टर डोस?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्याप्रमाणे बुस्टर डोस तसा मोफत मिळणार आहे. ज्यांना खासगी ठिकाणाहून हा डोस घ्यायचा असेल त्यांच्यासाठी आधी जी डोसची किंमत ठरवलेली आहे, त्याच किंमतीत हा बुस्टर डोस मिळेल. सर्व सरकारी, महापालिका तसच खासगी लसीकरण केंद्रावर हा बुस्टर डोस उपलब्ध आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, तसच व्याधीग्रस्त 60 वर्षावरील नागरिकांना बुस्टर डोस दिला जातोय.
वृद्ध व्यक्तींना ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांनी डोस कसा घ्यायचा?
ज्या 60 वर्षावरील व्यक्ती अनेक व्याधींनी ग्रस्त आहेत, त्यांनाच हा डोस देण्यात येणार आहे. या 22 व्याधींची यादी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. हा डोस घेण्यासाठी डॉक्टरांकडून इतर कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचेही सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने हा बूस्टर डोस घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.
बूस्टर डोस घेताना कोणती लस घ्यायची?
बुस्टर डोस देताना या आधी जी लस घेतली आहे, त्याच लशीचा बुस्टर डोस देण्यात येणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. ज्या लोकांनी कोव्हॅक्सीनची लस घेतली आहे, अशांना कोव्हॅक्सीनचाच बुस्टर डोस देण्यात येईल तर ज्यांनी कोव्हिशील्ड लस घेतली आहे, अशांना कोव्हिशील्डचाच बुस्टर डोस देण्यात येईल.
काय आहेत अटी, नियम?
सर्व शासकिय, महापालिका तसच खासगी लसीकरण केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करत किंवा थेट येऊन नोंदणी केली तरी बुस्टर डोस मिळणार आहे. ज्यांना दुसरा डोस घेऊन 9 महिने उलटले आहेत किंवा 39 आठवडे झालेत, त्यांनाच हा बुस्टर डोस मिळेल. नोकरीचे ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे तसच खासगी केंद्रात जरी लस घ्यायची असेल तरीसुद्धा सरकारी केंद्रावर येऊन वर्गवारी नोंदवावी लागेल. त्यानंतरच खासगी केंद्रावर लस घेण्याची मुभा आहे. विशेष म्हणजे सहव्याधी असलेल्या नागरिकांना बुस्टर डोस घेण्यासाठी कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही. तसच ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांची, फ्रंटलाईन वर्कर्सची, 60 वर्षापेक्षा कमी वय असलेल्यांची नोंद कोविण अॅपमध्ये कर्मचाऱ्यांऐवजी नागरिक म्हणून नोंद झालीय, त्यांनाही शासकीय तसच महापालिका केंद्रात थेट नोंदणी करुन लस मिळेल.