राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्घाटन समारंभ संपन्न
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी या अभियानामध्ये राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली .
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्घाटन समारंभ संपन्न
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी या अभियानामध्ये राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली .
बारामती वार्तापत्र
बारामती 20 :- 32 वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दिनांक 18 जानेवारी 2021 ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीत राबविण्यात येणार असून या अभियानाचा उद्घाटन समारंभ उप प्रादेशिक परिवहन कार्यालय , बारामती येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून टी.सी.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत मुरूमकर तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विलास कर्डिले व डॉ.भगवान माळी आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. मुरूमकर म्हणाले की , रस्ते अपघातामध्ये तरूणांचे मृत्यु ही चिंताजनक बाब आहे. तरूणांना रस्ता सुरक्षा विषयक माहितीचे प्रबोधन करणे ही सध्या अत्यावश्यक बाब झाली आहे. टी.सी. महाविद्यालयामध्ये रस्ता सुरक्षा विषयक विद्यार्थ्यांच्या प्रबोधनाचे कामकाज गेली अनेक वर्षे सातत्याने सुरू आहे. त्यामुळे या महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांचा त्यांचे चुकीमुळे एकही अपघात झालेला नाही , हे मी अभिमानाने सांगू इच्छितो. रस्त्यावरील वाहतूकीच्या गुन्ह्याकरीता दंडाच्या रकमेमध्ये केली जाणारी वाढ ही कायद्याचा धाक व त्यामुळे रस्त्यावर सुरक्षितता निर्माण होणे यासाठी आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच डॉ. कर्डिले व डॉ. माळी यांनी देखील उपस्थितांना त्यांचे अनुभवासह रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन केले.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी या अभियानामध्ये राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली . शाळा , महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष किंवा वेबीनारव्दारे रस्ता सुरक्षाविषयक मार्गदर्शन करण्यात येईल तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाहन वितरक व मोटार ड्रायव्हींग स्कूलचालक यांच्या सौजन्याने विविध ठिकाणी बॅनर लावण्यात येतील. वाहनचालकांसाठी टोलनाक्यावर वाहनचालकांची नेत्रतपासणी करण्यात येईल , साखर कारखान्यामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना परावर्तक बसविण्यात येतील तसेच त्या वाहनचालकांचे प्रबोधनही करण्यात येणार असून ओव्हरलोड , परावर्तिका नसणे , वाहनांचे दिवे चालू नसणे , हेल्मेट , मोबाईलचा वापर , अवैद्य प्रवासी वाहतूक इत्यादी बाबींसाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मान्यवरांच्याहस्ते वाहनचालकांसाठी मार्गदर्शक सूचनांच्या माहितीपत्रकांचे अनावरण व रस्ता सुरक्षा विषयी चित्रफिती दर्शविणाऱ्या एलईडी व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहा. मोटार वाहन निरिक्षक श्रीमती हेमलता मुळीक यांनी केले.