बारामतीत होमगार्ड कडून नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार
जाब विचारल्यास पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची धमकी
बारामतीत होमगार्ड कडून नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार
जाब विचारल्यास पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची धमकी
बारामती वार्तापत्र
पोलिसांवर अपुऱ्या मनुष्यबळामुळे येणारा ताण लक्षात घेता शासनाने पोलिसांच्या मदतीला होमगार्ड नेमणुकीस दिले आहेत. मात्र या होमगार्डच्या अती कर्तव्य दक्षतेमुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे.
बारामती, माळेगाव येथील हारुण सय्यद यांनी याविषयीची तक्रार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हारून सय्यद हे 7 जानेवारी रोजी आपल्या आजारी मुलाला घेऊन माळेगाव हुन बारामतीकडे दवाखान्यात येत होते. त्यावेळी निरा रस्त्यावरील टोल नाक्यावर एका होमगार्ड ने त्यांना अडवत बाराशे रुपये दंड होईल असे सांगून दोनशे रुपयांची मागणी केली. मुलाला घेऊन दवाखान्यात चाललो आहे असे सांगूनही त्यांनी न ऐकता वाहनाचे फोटो काढले.
तसेच 21 जानेवारी रोजी दूध संघाच्या चौकात होमगार्ड कडून असाच अनुभव आला. मात्र सय्यद यांनी त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली असता होमगार्डने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच तुम्ही माझ्याशी अशा पद्धतीने वागत असाल तर शिवीगाळ केल्याचा आरोप करून पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करेल अशीही धमकी दिली.
बारामती शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे परंतु वाहतूक पोलीस व त्यांच्या मदतीला असणारे होमगार्ड हे मात्र वाहनांचे फोटो काढत थेट कारवाई करत आहेत.गणेश मार्केट समोर दोन मिनिटासाठीहि वाहन लावता येत नाही. पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र तसे घडताना दिसत नसल्याची खंतही हरुण सय्यद यांनी निवेदनात केली आहे.